सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गण प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १९ हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यापुढे सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची, वाळवा तालुक्यातील येलूर, बावची जिल्हा परिषद गटात बदल झाले आहेत. उर्वरित १७ हरकती आयुक्तांनी फेटाळल्या आहेत.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, सर्व तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते. जिल्हा परिषद गटासाठी १६ व पंचायत समितीच्या गणासाठी तीन हरकतींचा समावेश होता. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट ६, गण १, जत तालुक्यात गट १, गण १, तासगावमध्ये गट २, कवठेमहांकाळ तालुक्यात एका गटासाठी, वाळवा तालुक्यात गट २, गण १, मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ४ हरकती दाखल झाल्या होत्या. यापैकी आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातील पुजारवाडी, देशमुखवाडी गावांचा दिघंची गटात समावेश करण्याची मागणी दादासाहेब हुबाले यांनी केली होती. त्यानुसार त्यांची हरकत विभागीय आयुक्तांनी मान्य करून पुजारवाडी, देशमुखवाडी दिघंची जिल्हा परिषद गटात समावेश करण्यास मान्यता दिली आहे, तसेच वाळवा तालुक्यातील येलूर गटातून भडकंबे गावाचा बावची गटात समावेश केला आहे. बावची गटातील ढवळी गावाचा येलूर गटात समावेश करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. उर्वरित १७ हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या आहेत.
Sangli: चार जिल्हा परिषद गटांमध्ये बदल, १७ हरकती फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:22 IST