चांदोली मत्सबीज प्रकल्प प्रशासनाकडून दुर्लक्षितच; सांगली, सातारा, कोल्हापूरला पुरेल इतके मत्स्यबीज निर्मितीची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:46 IST2024-03-22T18:38:12+5:302024-03-22T18:46:15+5:30
विकास शहा शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली ...

चांदोली मत्सबीज प्रकल्प प्रशासनाकडून दुर्लक्षितच; सांगली, सातारा, कोल्हापूरला पुरेल इतके मत्स्यबीज निर्मितीची क्षमता
विकास शहा
शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली दोन-तीन वर्षे झाली वापराविना पडून आहे. यामध्ये एकाही माशाचे बीजोत्पादन झालेले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरच चांदोलीचा मत्स्यबीज प्रकल्प पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याकडे मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यामार्फत हा दहा एकरमधील तीन जिल्ह्यांना फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर केला. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत सुचवलेल्या या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे. यातून चांदोलीच्या पर्यटनाला गती मिळणार असून, चांदोलीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
प्रकल्पाची उभारणी करताना मत्स्यबीज प्रकल्पातील तळ्याच्या बांधकामाचा भराव ठिकठिकाणी वाहून गेला होता. भरावाला भेगादेखील पडल्या होत्या. सांगलीच्या सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रस्थापित केलेल्या ४ कोटी ८८ लाख ८६ हजार खर्च करून बांधला आहे.
या मत्सबीज प्रकल्पात ८०० चौरस मीटरची तेरा तळी बांधली आहेत. प्रत्येक तळ्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारली जाणार आहेत. उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे, त्यांचे पालनपोषण करणे तसेच मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्य पिलांची साठवण करणे असे नियोजन या प्रकल्पात केले जाणार आहे. धरणाच्या पायथ्याला हा प्रकल्प उभारण्यात येत असल्यामुळे चांदोली धरणातील पाण्याचा वापर करून मत्स्य बिजापासून मोठ्या माशांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. नदीतील येणारे पाणी तळ्यांमध्ये साठवण्यासाठी फिल्टर चेंबर बांधण्यात येणार आहेत. तळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच सांडपाणी व्यवस्था मोरी बांधकाम करण्यात येणार आहे.
जवळच असणाऱ्या वारणा कालव्यातील पाणी सायफन पद्धतीने तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
अधिकाऱ्यांची उदासिनता
तीन जिह्यांसाठी उपयोगी ठरणारा तसेच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मंजूर केला. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी सांगितले आहे. मात्र, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत उदासिनता दिसून येते.
पर्यटन, रोजगार वाढेल तसेच येथील मत्स्य व्यावसायिकांना उपयोग होईल, यासाठी हा प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. - शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री