Sangli: अनैतिक संबंधातून सेंट्रिंग कामगाराचा खून, हल्लेखोर तिघे अल्पवयीन युवक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:22 IST2025-02-21T15:22:10+5:302025-02-21T15:22:44+5:30

दोन-तीन तासांत छडा

Centring worker murdered due to immoral relationship in Sangli, three minor youths arrested for attacking | Sangli: अनैतिक संबंधातून सेंट्रिंग कामगाराचा खून, हल्लेखोर तिघे अल्पवयीन युवक ताब्यात

Sangli: अनैतिक संबंधातून सेंट्रिंग कामगाराचा खून, हल्लेखोर तिघे अल्पवयीन युवक ताब्यात

सांगली : अनैतिक संबंधाच्या रागातून सेंट्रिंग कामगार दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, मूळ रा. इंदिरानगर, सध्या रा. शिवशंभो चौक) याचा तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून निर्घृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. हल्ल्यावेळी दत्ताचा मित्र अतुल दत्तात्रय ठोंबरे (रा. शिवशंभो चौक) हा आपल्याला देखील मारतील म्हणून पळून गेला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत खुनाचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार म्हणून सळ्या बांधण्याचे काम करत होता. त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुली आहेत. कुटुंबासह तो इंदिरानगर परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात एका महिलेशी अनैतिक संबंध जुळून आले. ती महिला अल्पवयीन मुलासह राहत होती. दत्ता याच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने त्याला जाब विचारला. पत्नीशी सतत वाद होऊ लागला. त्यामुळे तो गेली दीड ते दोन वर्षे महिलेच्या घरातच तिच्या मुलासह शिवशंभो चौक परिसरात राहत होता.

दत्ता सुतार हा फारसा कामधंदा करत नव्हता. महिलेचा मुलगा लहान असल्यामुळे सुरुवातीला त्याला समज नव्हती; परंतु नंतर आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध पाहून मुलाला दत्ताचा राग येत होता. बरेच दिवस तो राग सहन करून थांबला होता. गुरुवारी दुपारी तो दोन अल्पवयीन साथीदारांसह कदमवाडी परिसरात घोडी चरायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने दत्ताला पैसे पाहिजेत म्हणून कदमवाडी रस्त्यावर बोलवून घेतले.

नशेत असलेला दत्ता त्याचा मित्र अतुल ठोंबरे याला घेऊन कदमवाडीकडे दुपारी दीडच्या सुमारास दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) वरून निघाला. वाटेत तिघे अल्पवयीन युवक थांबलेले दिसले. अतुलने गाडी थांबवल्यानंतर मागे बसलेला दत्ता उतरला. तो खाली उतरताच तिघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ला पाहून मित्र अतुल पळून गेला. छातीवर दगड मारताच दत्ता खाली पडला. तेव्हा एडक्याने दत्ताच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करताच तो जागीच मृत झाला.

फारसी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर खून केल्यानंतर तेवढ्यात एक दुचाकीस्वार रस्त्यावरून येताना दिसताच तिघे युवक कदमवाडीकडे पळाले. खुनाची माहिती मिळताच उपअधीक्षक विमला एम., शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले आदींसह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत दत्ताचा मित्र अतुल ठोंबरे याने खुनाबाबत फिर्याद दिली आहे.

दोन-तीन तासांत छडा

एका दुचाकीस्वाराने शहर पोलिसांना खुनाची माहिती देताच पोलिस निरीक्षक संजय मोरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्याजवळ एक कोयता व बाजूलाच चाकू पडला होता. तसेच दुचाकीही तेथेच होती. मृताजवळ ओळखीचा पुरावा नव्हता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा मृताची ओळख पटली. त्यानंतर संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही तत्काळ ताब्यात घेतले.

तिघांकडून खुनाची कबुली

दत्ता सुतार याचा खून करणाऱ्या तिघा संशयित युवकांना पोलिसांनी काही वेळातच ताब्यात घेतले. चौकशीत एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. त्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Web Title: Centring worker murdered due to immoral relationship in Sangli, three minor youths arrested for attacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.