एकटं गाठून गाडीतून बाहेर काढलं, वार केले अन्... सांगलीत जुन्या वादातून पैलवानाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:38 IST2025-01-17T14:31:31+5:302025-01-17T14:38:00+5:30
सांगलीत पैलवानाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एकटं गाठून गाडीतून बाहेर काढलं, वार केले अन्... सांगलीत जुन्या वादातून पैलवानाची निर्घृण हत्या
Sangli Crime: सांगलीत पूर्ववैमन्यासातून एका पैलवानाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून अन्य संशयितांचा सुरु आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून ३५ वर्षीय पैलवानाची हत्या करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.
सांगलीत विटा भागातील कार्वे येथील स्मशानभूमीलगतच्या विटा - तासगाव रस्त्यावरील पुलावर मध्यरात्री १२ च्या सुमारास ही भयंकर घटना घडली. राहुल गणपती जाधव (वय ३५ रा.कार्वे, ता. खानापूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल जाधव हे गुरुवारी रात्री इर्टिगा गाडीने निघाले असता कार्वे गावच्या स्मशानभूमीजवळील पुलावर त्यांना अडवण्यात आलं. आरोपींनी राहुल यांना कारमधून बाहेर खेचून, त्याच्यावर तलवारीने आणि गुप्तीने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुल जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी यावेळी हॉकी स्टिकने राहुल यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. त्यामुळे पुलावर काचांचा सडा पडला होता.
पोलिसांना जवळपास तासाभराने या घटनेची माहिती मिळाली. याबाबत विटा पोलीस ठाण्यात राहुल जाधव यांचा भाऊ राजाराम जाधव यांनी सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयितांपैकी तिघांना अटक तात्काळ अटक केली. तर अन्य चार जण संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. माणिक संभाजी परीट, गजानान गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव अशी संशयितांची नावे असून त्यापैकी माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव यांचे विटा एमआयडीसी भागातील कार्वे हद्दीत हॉटेल व बार आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ते आपल्या हॉटेलवर गेले होते. त्यानंतर मध्यरात्री ते घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक भारत भोसले याने राहुलचा भाऊ राजाराम यांना फोन करून राहुल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी राहुल यांचा मृतदेह रस्त्यावर पडला होता आणि त्याच्या अंगावर व डोक्यावर तलवारीचे अनेक वार करण्यात आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणजिराज ढाब्याचे चालक आणि संशयित माणिक परीट यांच्यात आणि मृत जाधव यांच्यात बारमध्ये वाद झाला होता. या वादातून राहुल जाधव यांनी परीट यांना मारहाण केली होती. या मारहाणीच्या रागातून जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याची हत्या केली.