Sangli: पूर्ववैमनस्यातून शेडबाळ येथे एकाचा निर्घृण खून, उसाच्या शेतात सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:06 IST2025-07-22T15:05:58+5:302025-07-22T15:06:41+5:30
पोलिसांचा तपास सुरू

Sangli: पूर्ववैमनस्यातून शेडबाळ येथे एकाचा निर्घृण खून, उसाच्या शेतात सापडला मृतदेह
शिरगुपी : शेडबाळ (ता. कागवाड) येथील उसाच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव शशिकांत कृष्णा होनकांबळे (वय ५५, रा. शेडबाळ) असे असून, त्यांचा खून करून मृतदेह शेतात फेकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेमागे पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचा आरोप शशिकांत यांच्या मुलाने कागवाड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शेडबाळ येथील उसाच्या शेतात एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तोंडावर व शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने, खून करून मृतदेह फेकल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रुती एन. एस., अथणीचे उपनिरीक्षक प्रशांत मुन्नोळी, चिकोडीचे उपअधीक्षक गोपाळकृष्ण, तसेच कागवाड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. शशिकांत यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा दावा त्यांच्या मुलाने तक्रारीत केला आहे. कागवाड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कागवाड पोलिस करीत आहेत.
घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी
या घटनेमुळे शेडबाळ परिसरात तणावाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शशिकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा सैन्य दलात सेवेत असून दुसरा शेती व्यवसाय करतो.