माव्याच्या पैशावरून वाद, इस्लामपुरात भरदिवसा सराईत गुंडाचा निर्घृण खून; दोघा संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:22 IST2025-04-25T13:22:00+5:302025-04-25T13:22:14+5:30

माव्याच्या पैशावरून वाद

Brutal murder of a gangster in broad daylight in Islampur, Two suspects arrested | माव्याच्या पैशावरून वाद, इस्लामपुरात भरदिवसा सराईत गुंडाचा निर्घृण खून; दोघा संशयितांना अटक

माव्याच्या पैशावरून वाद, इस्लामपुरात भरदिवसा सराईत गुंडाचा निर्घृण खून; दोघा संशयितांना अटक

इस्लामपूर : शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आणि मोक्काची कारवाई झालेल्या गुंडाचा अज्ञात मारेकऱ्यांनी दुपारी दीडच्या सुमारास धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घडली. भर बाजारात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून गर्दीतूनच पलायन केले. २४ तासांच्या आत खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन संजय पालकर (वय ३५, रा. किसाननगर, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नितीन याने आपली स्वत:ची टोळी निर्माण केली होती. शहरातील गुन्हेगारीवर वर्चस्व ठेवण्यासाठी त्याच्या टोळीकडून अनेक वेळा दहशत माजवण्याच्या घटना घडल्या आहेत.

गुरुवारी दुपारी तो वाळवा बझारच्या बाजूला असलेल्या टपऱ्यांसमोर आला होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, छातीवर वर्मी वार केले. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने या परिसरात नागरिकांची गर्दी होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात ही घटना घडली. यावेळी तेथे असलेल्या नागरिकांची पळापळ झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारुगडे हे घटनास्थळी पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम त्यांनी सुरू केले.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात नितीन पालकर याला उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय परिसरात त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. त्याची पत्नी आणि मुले आक्रोश करत होती. दरम्यान, पोलिसांकडून हल्लेखोरांचा माग काढण्यासह घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

दोघा संशयितांना अटक

याप्रकरणी करण आनंदा जाधव याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पान टपरीचालक यश महेश माने (वय २०) आणि वैभव दत्तात्रय थोरात (वय २१, दोघे रा. इस्लामपूर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली.

माव्याच्या पैशावरून वाद

बुधवारी रात्री माव्याचे पैसे देण्यावरून नितीन पालकर व यश माने यांचा वाद झाला होता. माने याने त्याला बघून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी पालकर हा दोघा साथीदारांसोबत यशच्या पान टपरीजवळ आला. यशने त्याला पैसे मागितल्याने नितीनने त्याचा क्यूआर कोड फेकून दिला. यावर दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. या झटापटीत यश माने आणि वैभव थोरात अशा दोघांनी चॉपर आणि कोयत्याने पालकर याच्या अंगावर सपासप वार करून त्याचा खून केला.

तब्बल २४ वार..

गुंड नितीन पालकरच्या दादागिरीला त्रासलेल्या यश माने व वैभव थोरात या दोघांनी त्याचा अत्यंत त्वेषाने खात्मा केला. त्याच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर चॉपर आणि कोयत्याने तब्बल २४ वार केल्याचे पालकर याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.

पालकरवर १६ गुन्ह्यांची नोंद..

नितीन पालकर याच्यावर १३ गंभीर तर ३ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. वडगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याची कारवाई प्रलंबित होती. तर, मोक्कासारख्या मोठ्या कारवाईतून तो बाहेर पडला होता. खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजविणे अशा गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद आहे.

नागरिकांची पळापळ..

वाळवा बझार समोरील परिसरात गुरुवारी आठवडा बाजार भरत असतो. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. या परिसरातच भरदुपारी खुनाची ही घटना घडल्यावर भाजीपाला व्यापाऱ्यांसह तेथील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती. जीवघेणा हल्ला डोळ्यासमोर घडताना अनेकांची पळताभुई थोडी झाली होती.

Web Title: Brutal murder of a gangster in broad daylight in Islampur, Two suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.