Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:06 IST2025-09-02T12:05:03+5:302025-09-02T12:06:59+5:30
शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन केली फसवणूक

Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दलाल महेश पांडुरंग पाटील (रा. कवलापूर) याला ६ महिने सक्तमजुरी व ८ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. आर. कल्हापुरे यांनी हा निकाल दिला.
कवलापूर येथील शेतकरी बाबासाहेब आनंदराव जाधव (रा. कवलापूर) यांची डाळिंबाची बाग आहे. गावातीलच महेश पाटील हा दलाल आहे. शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून तो परराज्यातील कंपनी व मोठ्या व्यापाऱ्यांना पाठवण्याचा व्यवसाय असल्याचे महेश सांगत होता.
महेश पाटील याने २०१४ मध्ये जाधव यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख ८० हजार ८०४ रुपयांचे डाळिंब खरेदी केले होते.
यापोटी त्याने जाधव यांना १ लाख ७० हजार रुपये रोख दिले. तर उर्वरित रकमेसाठी आयसीआयसीआय बँकेचे दोन धनादेश दिले. यापैकी एका धनादेशावर २ लाख रुपये, तर दुसऱ्या धनादेशावर २ लाख ४२४ रुपये, अशी रक्कम नमूद होती. जाधव यांनी दोन्ही धनादेश त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. धनादेश वटण्यासाठी गेल्यानंतर दलाल पाटीलच्या खात्यावर पुरेशी रक्कम नाही तसेच खाते सील आहे, असा शेरा मारलेले धनादेश जाधव यांच्याकडे परत आले.
धनादेश न वटता फसवणूक केल्याबद्दल जाधव यांनी ॲड. नरेश पाटील व ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांच्यामार्फत सांगलीतीलन्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. चौकशीत दलाल पाटील यास दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी व ८ लाख रुपयांचा दंड सुनावला. दंडाच्या रकमेपैकी ४ लाख ४२४ रुपये फिर्यादी जाधव यांना देण्याचे व अपील मुदत संपल्यानंतर उर्वरित ४ लाख रुपये सरकारला जमा करण्याचे आदेश दिले.