Sangli: कृषीतील लाचखोर निरीक्षकास तीन दिवस पोलिस कोठडी, अहवाल देण्यासाठी घेतली होती ३० हजाराची लाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:36 IST2025-04-26T16:36:01+5:302025-04-26T16:36:20+5:30
सांगली : शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता ...

Sangli: कृषीतील लाचखोर निरीक्षकास तीन दिवस पोलिस कोठडी, अहवाल देण्यासाठी घेतली होती ३० हजाराची लाच
सांगली : शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी (वय ४६, सध्या रा. गणेश नमन अपार्टमेंट, दालचिनी हॉटेलसमोर, विश्रामबाग) याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तक्रारदार यांनी कडेगाव एमआयडीसी येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी करार केला आहे. पॅरागॉन ॲग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन केली. त्याचे बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र एमआयडीसी कार्यालयाकडून प्राप्त केले होते. शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (DRC) मिळावे यासाठी फाइल तयार केली होती.
तत्पूर्वी जिल्हा कृषी विभागाकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो. तो अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रुपये लाच घेतली असता दि. २४ रोजी चौधरी याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली.
शुक्रवारी लाचखोर चौधरीला सांगलीतील न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार चौधरीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.