Sangli: सुट्टीवर आलेल्या बुर्लीच्या जवानाचा अपघातामध्ये मृत्यू, अंत्यदर्शनासाठी पत्नीला स्ट्रेचरवरून आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:42 IST2025-04-23T18:42:03+5:302025-04-23T18:42:20+5:30

शासकीय इतमामात दफन : बंदुकीच्या फैरी झाडून ‘बीएसएफ’ची मानवंदना

Border Security Force jawan Riyaz alias Amar Miraso Inamdar from Burli Sangli died in an accident | Sangli: सुट्टीवर आलेल्या बुर्लीच्या जवानाचा अपघातामध्ये मृत्यू, अंत्यदर्शनासाठी पत्नीला स्ट्रेचरवरून आणले

Sangli: सुट्टीवर आलेल्या बुर्लीच्या जवानाचा अपघातामध्ये मृत्यू, अंत्यदर्शनासाठी पत्नीला स्ट्रेचरवरून आणले

पलूस : बुर्ली (ता. पलूस) येथील सीमा सुरक्षा दलाचे मुख्य जवान रियाज ऊर्फ अमर मिरासो इनामदार (वय ४६) सध्या रा. विजापूर एडगे पेट्रोल पंपाजवळ, मूळ गाव बुर्ली, ता. पलूस यांचे अपघाती निधन झाले. इनामदार यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवाचे शासकीय इतमामात व बंदुकीच्या फैरी झाडून दफन करण्यात आले. 

मुजावर हे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. ते सुट्टीनिमित्त विजापूरहून बुर्लीस परत येत असताना अथणीजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एस. टी. बसला चारचाकीची धडक बसून रियाज इनामदार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २० रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान घडली. त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी सानिया इनामदार (वय ४१) व मुलगा शाहीद इनामदार (१५) हे दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी, रियाज इनामदार हे बीएसएफ सीमासुरक्षा दलात त्रिपुरा येथे देशसेवेत कार्यरत होते. त्यांनी तब्बल २६ वर्षे देशसेवा केली आहे. त्यांचे मूळ गाव हे बुर्ली असून ते विजापूर येथे सासरवाडीत स्थायिक झाले होते. सध्या १५ दिवसांच्या सुट्टीवर विजापूरला आले होते. स्वत:च्या चारचाकीतून पत्नी व मुलगा तिघे बुर्लीकडे कुटुंबास भेटण्यासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला. 

पत्नी सानिया या गंभीर जखमी असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर मिरज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पलूस तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. रियाज यांच्या मृत्यूने संपूर्ण पलूस तालुका व बुर्ली गावावर शोककळा पसरली. बुर्लीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. गावच्या प्रमुख मार्गावरून रियाज यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत जवान ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

पत्नीला अंत्यदर्शनासाठी स्ट्रेचरवरून आणले

पत्नी सानिया यांना अंत्यदर्शनासाठी स्ट्रेचरवरून आणण्यात आले. दोन्ही घटना पाहून गावातील महिलांना अश्रू अनावर झाले होते. रियाज व पत्नी यांना पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

Web Title: Border Security Force jawan Riyaz alias Amar Miraso Inamdar from Burli Sangli died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.