Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:53 IST2025-09-01T13:51:01+5:302025-09-01T13:53:29+5:30
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हजारे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले

Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
सांगली : अंकली (ता. मिरज) येथे कृष्णानदीवरील पुलावरून शनिवारी दुपारी पतीसमोर नदीत उडी टाकलेल्या अनिता अरविंद हजारे (वय ५०, रा. अग्रण धुळगाव) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी पुलापासून काही अंतरावर सापडला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हजारे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
अग्रण धुळगाव येथील हजारे दाम्पत्य शनिवारी दुपारी उचगाव (कोल्हापूर) ला निघाले होते. अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर हजारे यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यामुळे गाडी थांबवली. मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर अनिता यांनी पती अरविंद यांच्या हातात मोबाईल देत अचानक पुलाच्या कठड्यावरून नदीत उडी घेतली होती.
अरविंद यांनी आरडाओरड केला. त्यामुळे पुलावरून जाणारे वाहनधारक थांबले. सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पुलावर येऊन गर्दी हटवली. सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सने शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत बोटीतून शोध घेतला.
रेस्क्यू फोर्सच्या पथकातील कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, सचिन माळी, असिफ मकानदार, आकाश कोलप यांच्या पथकाने रविवारी शोधकार्य सुरू केले. अंकली पुलापासून काही अंतरावर दुपारी चारच्या सुमारास अनिता हजारे यांचा मृतदेह आढळून आला. तो बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये दाखल केला.
सांगली ग्रामीण ठाण्यात नोंद
अंकली पुलावर दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर की सांगली असा पेचप्रसंग निर्माण होतो. शनिवारी देखील दोन्ही पोलिस ठाण्यात चर्चा झाली. अखेर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली.