Sangli: प्रेमसंबंधातून खून, कृष्णा नदीत फेकले; तीन दिवसांनी मसुचीवाडीत सापडला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:46 IST2025-11-08T19:44:08+5:302025-11-08T19:46:01+5:30
कृष्णा नदीत फेकलेला मृतदेह

Sangli: प्रेमसंबंधातून खून, कृष्णा नदीत फेकले; तीन दिवसांनी मसुचीवाडीत सापडला महिलेचा मृतदेह
बोरगाव : ईश्वरपूर (ता. वाळवा) येथील रसिका मल्लेशी कदम या विवाहित महिलेचा प्रेमसंबंधातून खून करून कृष्णा नदीत फेकलेला मृतदेह तीन दिवसांनी मसुचीवाडी येथे सापडला. आरोपी तुकाराम वाटेगावकर (रा. बोरगाव) याने या खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिस आणि बचाव पथकांनी नदीपात्रात बोटींच्या साहाय्याने तीन दिवसांपासून सुरू केलेल्या शोध मोहिमेला शुक्रवारी यश आले.
ईश्वरपूर येथील रसिकाचे तुकाराम वाटेगावकर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रसिका ही वारंवार तुकारामकडून पैसे मागत असल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाला कंटाळून तुकारामने तिला पैसे देतो, असे सांगून शेतातील शेडमध्ये बोलावले. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि आरोपीने रसिकाचा गळा आवळून खून केला, अशी कबुली पोलिसांसमोर दिली. यानंतर आरोपीने मृतदेह दुचाकीवर ठेवून ताकारी येथील कृष्णा नदीवरील पुलावरून दुचाकीसह नदीत फेकला. शोध मोहिमेदरम्यान दुचाकी प्रथम सापडली, मात्र मृतदेह आढळला नव्हता.
शोधमोहीम तीन दिवस अखंड सुरू होती. नदीच्या पाण्याचा वेग, पाणीपातळी व मृतदेह विघटनामुळे शोधकार्य कठीण होते. अखेर शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास मृतदेह ताकारी पुलापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर मसुचीवाडी घाटाजवळ सापडला. या मोहिमेत बोरगाव ग्रामपंचायत यांत्रिक बोट कर्मचारी अर्जुन वाझे, शंकर बायदंडे आयुष हेल्पलाइन, कुपवाड सांगली येथील अविनाश पवार, सूरज शेख, सीमनाथ ऐवळे, प्रमोद ऐवळे, जमीर बोरगावे, नरेश पाटील, हिमांशू कुरळपकर, चिंतामणी पवार यांनी व पोलिसांच्या तुकडीने विशेष परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समाधान घुगे करत आहेत.