शीतल पाटीलसांगली : महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध करून भाजपने शहराच्या सत्ताकारणाचा श्रीगणेशा धडाक्यात केला. काठावरचे बहुमत असतानाही संख्याबळाची अचूक जुळवाजुळव करत भाजपने मजबूत बहुमत उभे केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत एकवटलेले विरोधकांना निष्प्रभ केले. यंदा भाजपने महापालिका निवडणुकीपासूनच सावध आणि मोजकी पावले टाकली. संघर्ष टाळत, पण डावपेचात आक्रमक राहून भाजपने युद्धातही आणि तहातही विजय मिळविल्याचे चित्र आहे. बिनविरोध निवडीमुळे केवळ सत्तेवरच नव्हे, तर महापालिकेच्या आगामी राजकारणावरही भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.यंदा महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरूद्ध सारे असे चित्र होते. महायुतीत असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना स्वतंत्र लढत होती. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची आघाडी होती. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने छुपा समझोता केला. तिन्ही पक्षांनी एकमेकाविरोधात उभे केले नाही. उलट एका प्रभागात तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पॅनेलमध्ये काँग्रेसला दोन जागा देण्यात आल्या. भविष्यात काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असेच चित्र निर्माण केले गेले. त्यात शिंदेसेनेने भाजपसोबतची युती तुटताच सर्वच प्रभागात उमेदवार उभे करून आव्हान दिले.पण या लढाईतही भाजपनेच बाजी मारली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. काठवरचे बहुमत हाती असल्याने मजबूत संख्याबळासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय रणनीती आखली. त्याला भाजपचे दोन्ही आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शेखर इनामदार, सुरेश आवटी यांची साथ लाभली.राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेनेही भाजपविरोधात निवडणूक लढविली असल्याने दोघांचा पाठिंबा घेण्यावरून भाजपमध्ये मतभेद होते. पण सत्ता समीकरणे आपल्या बाजूने झुकविण्यासाठी भाजपने दोन पावले मागे जाण्याची भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांच्या पथ्यावर पडली.अखेर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपला पाठिंबा दिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राजकीय चाल यशस्वी ठरली. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्याने युतीचे संख्याबळ ५५ वर पोहोचले. बहुतमाचा ४० आकडा पार केल्याने महापौर-उपमहापौर निवडीचा मार्गही मोकळा झाला होता. आता पाटील यांनी शिंदेसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षालाही सोबत घेण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही पक्षाला सत्तेत सहभागी करून काँग्रेसला पूर्णपणे एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. तो यशस्वी ठरताना दिसत आहे.
विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेण्याची संधी असूनही काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतल्याने भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला. परिणामी, महापालिकेतील सत्तासमीकरणे भाजपच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तेच्या पहिल्याच टप्प्यात स्थैर्य आणि नियंत्रणाचा संदेश देण्यात भाजप यशस्वी ठरला असून, आता अपेक्षांच्या ओझ्याखाली प्रत्यक्ष कामगिरी दाखवण्याचे आव्हान पक्षापुढे उभे आहे.लढलेले आघाडीतून, पाठिंबा भाजपलामहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने सुरुवातीपासून स्वबळावर लढण्याची तयारी केली. त्यात काँग्रेस आघाडीची साथ मिळाली. सर्वच प्रभागात एकमेकांना सहकार्याची भूमिका घेतली. भाजपविरोधात एकच पॅनेल उभे राहील, याची दक्षता घेतली. मात्र निकालानंतर सत्ताकारणाची गणितेच बदलली. आघाडीसोबत लढलेली राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष भाजपसोबत गेल्याने सत्तेत येण्याचे आघाडीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
Web Summary : BJP secured Sangli's municipal corporation by strategic alliances, gaining majority. Despite initial opposition, BJP swayed NCP (Ajit Pawar) support, sidelining Congress. This victory strengthens BJP's control over Sangli's politics, presenting governance challenges.
Web Summary : बीजेपी ने रणनीतिक गठबंधनों से सांगली नगर निगम हासिल किया, बहुमत प्राप्त किया। प्रारंभिक विरोध के बावजूद, बीजेपी ने एनसीपी (अजित पवार) का समर्थन प्राप्त किया, कांग्रेस को अलग कर दिया। इस जीत से सांगली की राजनीति पर बीजेपी का नियंत्रण मजबूत हुआ, जिससे शासन की चुनौतियां पेश हुईं।