Sangli Municipal Election 2026: महायुतीसाठी भाजपची धावपळ; राष्ट्रवादी, शिंदेसेनेशी स्वतंत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:59 IST2025-12-18T18:58:53+5:302025-12-18T18:59:18+5:30

मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्यावर जबाबदारी

BJP accelerates moves to strengthen grand alliance for Sangli Municipal Corporation elections | Sangli Municipal Election 2026: महायुतीसाठी भाजपची धावपळ; राष्ट्रवादी, शिंदेसेनेशी स्वतंत्र चर्चा

Sangli Municipal Election 2026: महायुतीसाठी भाजपची धावपळ; राष्ट्रवादी, शिंदेसेनेशी स्वतंत्र चर्चा

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महायुती मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून महायुतीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे व प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांची समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे.

भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पालकमंत्री पाटील यांनीही महायुतीतून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पण महायुतीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ३० तर शिंदेसेनेने २० जागांची मागणी केली आहे. त्यात भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. तब्बल ५७० जणांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती तुटू नये, यासाठी भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा करण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यावर सोपविली आहे. मिरज परिसरात राष्ट्रवादीकडून जादा जागांची मागणी होत असल्याने ही चर्चा महत्त्वाची मानले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देशपांडे संवाद साधणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी शेखर इनामदार यांची नियुक्ती केली आहे. इनामदार यांनी दोन दिवसांपूर्वी सेनेचे मोहन वनखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा केली. महायुती अबाधित ठेवण्यासाठी भाजपने समन्वयाची भूमिका घेतली आहे.

शिवसेनेकडून सुहास बाबर करणार चर्चा

शिवसेनेने चर्चेसाठी आमदार सुहास बाबर यांच्यावर जबाबदारी दिल्याचे संपर्कप्रमुख मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज स्पष्ट केले. भाजप व शिंदेसेनेत प्राथमिक चर्चा झाली आहे. आता जागा वाटपाच्या चर्चेसाठी लवकरच बैठक होईल. या बैठकीत शिंदेसेनेकडून जागांचा प्रस्ताव भाजपला दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजपचा अहवाल प्रदेशकडे, पहिली यादी लवकरच

भाजपच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. ५७० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, दिनकर पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीचा अहवाल भाजप प्रदेश समितीकडे सादर करण्यात आला आहे. भाजपने चार दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे.

अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर जागा वाटपावर चर्चा

मिरजेतील माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काँग्रेस, भाजप, जनसुराज्य पक्षाच्या दिग्गजांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दि. १९ रोजी मिरजेत येणार आहेत. पक्षप्रवेश झाल्यानंतरच राष्ट्रवादीकडून जागा वाटपाच्या चर्चेला गती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: BJP accelerates moves to strengthen grand alliance for Sangli Municipal Corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.