Sangli News: बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस नवीन वर्षापासून धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:39 IST2025-12-26T14:37:12+5:302025-12-26T14:39:33+5:30
मिरजेतून मुंबई व बंगळुरूला जाण्याची सोय : गाडीला असणार १७ बोग्या

Sangli News: बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस नवीन वर्षापासून धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार..वाचा
मिरज : मिरज-दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातून बंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान नवीन एक्स्प्रेस गाडी नवीन वर्षापासून सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या या एक्स्प्रेसमुळे मिरजेतून मुंबई व बंगळुरूला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
बंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. ही गाडी आठवड्यात दोन दिवस धावणार असून, आधुनिक एलएचबी प्रकारच्या १७ बोग्यांची ही एक्स्प्रेस नववर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून रात्री ८:३५ वाजता आणि बंगळुरू येथून रात्री १०:३० वाजता गाडी सुटेल. बंगळुरूहून शनिवार आणि मंगळवार, तर मुंबईहून रविवार आणि बुधवार या दिवशी गाडी धावणार आहे. या गाडीला दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे याठिकाणी थांबे देण्यात येतील.
बेळगाव, मिरज, सांगलीतील प्रवशांची सोय
हुबळी, मिरज आणि पुणे येथे या गाडीत पाणी भरण्यात येणार असून, मुंबई आणि बंगळुरू येथे यांना दुरुस्ती व देखभाल केली जाईल. या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसमुळे बेळगाव, मिरज आणि सांगली भागातील प्रवाशांना थेट मुंबई व बंगळुरूला जाण्यास सोय झाली आहे. बंगळुरूमधील आयटी आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच पुणे-मुंबईमध्ये शिक्षण व नोकरी करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री सुटणारी ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. एलएचबी बोगी असल्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि वेगवान होणार आहे.