..तर युती करु, अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा; अजित पवार यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:40 IST2025-11-07T18:39:09+5:302025-11-07T18:40:42+5:30
अजितदादांच्या सूचनेने स्वतंत्र लढण्याची मोकळीक

..तर युती करु, अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा; अजित पवार यांच्या सूचना
सांगली : ‘फायदा होत असेल, तर युती करा अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा’ अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. गुरुवारी मुंबईत वरळी डोममध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मते जाणून घेतली.
यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. बैठकीला पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, तम्मणगौडा रवी पाटील यांच्यासह विविध तालुक्यांचे व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील राजकीय स्थितीची माहिती पक्षनेत्यांना दिली. युतीसंदर्भात स्थितीचे विश्लेषण केले. अजित पवार यांनी ग्रामीण व शहरी नेत्यांकडून जिल्ह्याच्या राजकीय स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा व महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांसोबत युतीचा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा. जिल्ह्याच्या नेत्यांनी युतीच्या फायदा-तोट्यांचा अभ्यास करावा.
युती केल्याने आपला फायदा होणार असेल, अधिकाधिक जागा निवडून येणार असतील किंवा सत्तेत चांगला वाटा मिळणार असेल, तर युती करायला हरकत नाही; पण स्वतंत्र लढण्याने जास्त जागा जिंकण्याची हमी असेल, तर स्थानिक स्तरावर तसा निर्णय घेण्यास जिल्हा नेत्यांना मोकळीक असेल. निवडणुकीनंतर पुन्हा युतीसंदर्भातील निर्णयही स्थानिक स्तरावरच घ्यावा.
अजितदादांच्या सूचनेने स्वतंत्र लढण्याची मोकळीक
दरम्यान, महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नव्हती; पण अजित पवार यांनी मुंबईत आज स्पष्ट सूचना दिल्याने स्थानिक स्तरावर स्वतंत्र लढण्याची मोकळीक मिळाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत याच भूमिका कायम राहिल्यास सर्वत्र बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. त्याबरोबर मोठ्या संख्येने इच्छुकांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.