सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधारकार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:30 IST2025-03-17T14:28:39+5:302025-03-17T14:30:21+5:30

राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

Bangladeshi infiltrator arrested in Sangli, staying at lodge on the basis of fake Aadhaar card | सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधारकार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य

सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधारकार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य

सांगली : बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तेथून घुसखोरी करून कोलकता, पुणेमार्गे थेट सांगलीत येऊन एका लॉजवर राहणाऱ्या अमीर शेख याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. दिल्लीतील बनावट आधार कार्डच्या आधारे तो लॉजवर राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घुसखोर अमीर शेख हा बांगलादेशातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

शनिवारी मध्यरात्रीनंतर सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. रविवारी सकाळी पथकाला पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एक संशयितरीत्या फिरताना मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीत अमीर शेख (रा. दिल्ली) असे नाव सांगितले. शेख याने आधार कार्डही दाखवले. आधार कार्डावर एबीसी नजदीक, आंबेडकर चौक, मुनरीका गाव जेएनयू दक्षिण-पश्चिम दिल्ली असा पत्ता दिसला.

शेख याची चौकशी करताना त्याची भाषा ऐकून पोलिसांचा संशय वाढला. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला तपासला. त्यामध्ये बंगालीभाषेचा वापर व ८८० आयएसडी कोड असलेले मोबाईल व लँडलाईन नंबर पोलिसांना आढळून आले. तसेच कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.

कागदपत्राशिवाय घुसखोरी

बेकायदेशीररीत्या कोणत्याही अधिकृत कागदपत्राशिवाय भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने शेख याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक, फोर्जरीसह कलम ३(अ), ६(अ) पारपत्र अधिनियम (भारतामध्ये प्रवेश) १९५०, कलम १४ अ (ब) परकीय नागरिक आदेश १९४८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.

संशयास्पद हालचालींची चौकशी

शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे म्हणाले, बांगलादेशी आमिर शेख हा त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून १३ मार्च रोजी विमानाने कोलकताला आला. तेथून पुण्यात आला. शिवाजीनगर बसस्थानकातून सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील विशाल लॉज येथे राहत होता. बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तो घुसखोरी करून भारतात आला. रात्री तो शहरात संशयास्पद का फिरत होता ? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास सुरू आहे.

Web Title: Bangladeshi infiltrator arrested in Sangli, staying at lodge on the basis of fake Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.