सांगली-कोल्हापूर रस्त्याला मुहूर्त कधी?, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:57 IST2024-12-24T18:56:52+5:302024-12-24T18:57:51+5:30
आणखी किती बळी घेणार?

सांगली-कोल्हापूर रस्त्याला मुहूर्त कधी?, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष
सांगली : सांगली ते कोल्हापूर या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे सापळे तयार झाले आहेत. या रस्त्यावरून सुरक्षितरीत्या प्रवास करणे, म्हणजे मोठी लढाई जिंकण्यासारखी स्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदारांच्या लेखी हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानेही त्याकडे दुर्लक्षाचेच धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.
सांगली-कोल्हापूरदरम्यान दररोज हजारो वाहने धावतात. हे पाहता त्याचा दर्जा किमान राज्य महामार्गासारखा असायला हवा. पण, प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. सांगलीपासून अतिग्रेपर्यंत सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर फुटभर खोलीचे आहेत. दोन्ही बाजूंच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. चौंडेश्वरी सुतगिरणीजवळ तर सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने धुळीचे लोट उठतात.
अंकली ते जयसिंगपूरदरम्यानही शोचनीय अवस्था आहे. उदगावमध्ये बंद पथकर नाक्याजवळ रस्त्यावर थोडेही डांबर उरलेले नाही. जयसिंगपूर ते इचलकरंजी फाटा यादरम्यान मध्येच येणारा भलामोठा खड्डा एखाद्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कधीही कारणीभूत होऊ शकतो. ते भरण्याची तसदी महामार्ग प्राधिकरण घेताना दिसत नाही. दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा तितकाच महत्त्वाचा रस्ता दुरुस्त का केला जात नाही? असा खडा सवाल प्राधिकरणाला विचारण्याचे धाडस सांगली, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी करत नाहीत, हे प्रवाशांचे दुर्दैव आहे.
जबाबदारी सांगलीच्या की कोल्हापूरच्या नेत्यांची?
मागण्यांच्या पूर्ततेसाठी दणकेबाज आंदोलनांची मर्दुमकी दाखविणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगली रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असा प्रश्न आहे. तर, सांगलीचे नेते महागड्या आरामदायी गाड्यांमधून प्रवास करत असल्याने त्यांना खड्ड्यांचा जाच होत नसावा, अशी शंका निर्माण होत आहे.
रस्ता करायचा नव्हता, तर महामार्गने घेतला कशासाठी?
सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला, तेव्हापासून या रस्त्याचे रडगाणे सुरू झाले आहे. तत्पूर्वी सांगलीपर्यंतचा भाग सांगलीचा सार्वजनिक बांधकाम तंदुरुस्त ठेवायचा. कोल्हापूरच्या भागावर तेथील सार्वजनिक बांधकामचे लक्ष होते. प्राधिकरणाने तो ताब्यात घेतल्यापासून त्याचे रडगाणे सुरू झाले आहे.
आणखी किती बळींची प्रतीक्षा?
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंकली पुलावरून चारचाकी पात्रात कोसळून सांगलीतील तिघांचा बळी गेला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग येऊन पुलावर बॅरिकेड्स बसविले गेले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही अशाच बळींची प्राधिकरणाला प्रतीक्षा आहे का?, असा प्रश्न आहे.