Sangli: मिरजेत अतिक्रमणे हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, विक्रेत्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:43 IST2025-11-22T19:42:25+5:302025-11-22T19:43:16+5:30
माजी नगरसेवकांचा कारवाईत हस्तक्षेपाचा प्रयत्न

Sangli: मिरजेत अतिक्रमणे हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, विक्रेत्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तणाव
मिरज : मिरज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारपासून मिरज मार्केट व शनिवार पेठ परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईस शुक्रवारी विरोधासाठी एका व्यापाऱ्याने पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
मिरजेत गांधी उद्यानाजवळील अतिक्रमण हटवण्यास विरोध करण्यासाठी एका दुकानदाराने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी त्याला रोखले. शहरात वाढत्या अनधिकृत स्टॉल्स व विनापरवाना विक्रेत्यांमुळे रस्ते अरुंद होत असल्याने ही कारवाई आवश्यक झाली होती.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. तसेच पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे लवकरच काढली जाणार असल्याचा इशारा देत नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मिरजेत रस्ते मोकळे करण्यासाठी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
माजी नगरसेवकांचा कारवाईत हस्तक्षेपाचा प्रयत्न
काही माजी नगरसेवकांनीही कारवाईत हस्तक्षेपाचा प्रयत्न केला; परंतु महापालिकेने ठाम भूमिका घेत अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाशेजारील उद्यान परिसर, मार्केट परिसर आणि शनिवार पेठेत दुकानांसमोर वाढविलेल्या पायऱ्या, शेड, फलक, फूटपाथ व रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटविण्यात आली.