Sangli: आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, माय-लेकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:34 IST2025-10-11T19:34:04+5:302025-10-11T19:34:21+5:30
पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली.

Sangli: आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, माय-लेकावर गुन्हा
पलूस : मोराळे (ता. पलूस) येथे चुलत भावास मारहाण करून जखमी केलेल्या संशयितास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून पोलिसास जखमी केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हैबती गुंडा पाटील व त्याची आई रुक्मिणी गुंडा पाटील या दोघांविरूद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली.
याप्रकरणी पोलिस शिवाजी विठ्ठल जाधव (वय ४५, रा. पलूस) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हैबती पाटील यास अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, ३० सप्टेंबर रोजी हैबत पाटील याने त्याचा चुलत भाऊ धनाजी पाटील याला पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ करून डोक्यात कुऱ्हाडीने वार केला होता. गुरुवार, दि. ९ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस पथक हैबती यास अटक करण्यासाठी मोराळे येथे गेले असताना हैबती व त्याच्या आईने पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली.
दरम्यान, हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांनी संशयितास घराबाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्यांना ढकलून देत धक्का बुक्की केली. काठीने हात व पायावर मारहाण केली. या प्रकारामुळे हैबती याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि लोकसेवकावर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
आतापर्यंत ११ गुन्हे दाखल
हैबती पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आतापर्यंत ११ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे व गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यात सहभाग असल्याने यापूर्वी त्याला हद्दपारही केले होते. तरीसुद्धा तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.