तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:58 IST2026-03-10T15:56:45+5:302026-03-10T15:58:13+5:30
उपसभापतीपदी सुखदेव पाटील, निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका गटाने सत्तांतर घडवून आणले

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड
तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी कुमठे पंचायत समिती गणाच्या अरुणा पाटील यांची, तर उपसभापतीपदी वायफळे पंचायत समिती गणाचे सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता लष्करे यांनी काम पाहिले. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माध्यमातून सत्तांतर घडवून आणले होते. पंचायत समितीत अजित पवार गटाचे ८, शरद पवार गटाचे ३, तर भाजपचा १ सदस्य विजयी झाला आहे.
वाचा: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी
मंगळवारी झालेल्या सभापती व उपसभापती निवडीवेळी अजित पवार गटाकडून सभापती पदासाठी अरुणा पाटील, तर उपसभापती पदासाठी सुखदेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे, शरद पवार गटाकडून सभापती पदासाठी कल्पना पाटील आणि उपसभापती पदासाठी विद्याराणी चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी लष्करे यांनी सभापतीपदी अरुणा पाटील, तर उपसभापतीपदी सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, डॉ. प्रताप पाटील, बाबासाहेब पाटील, शशिकांत जमदाडे, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार केला. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, महेश पाटील, प्रमोद शेंडगे, ऋषिकेश बिरणे, उमेश पाटील, बालिका माने, राजेश्वरी पाटील उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.