आयटीआयमध्ये मिळणार ड्रोन, एआयचे शिक्षण; नव्या सहा अभ्यासक्रमांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:24 IST2025-06-07T17:24:08+5:302025-06-07T17:24:48+5:30
विजेवरील वाहनांचे व्यवस्थापन; सोलर तंत्रज्ञ यांचा समावेश

आयटीआयमध्ये मिळणार ड्रोन, एआयचे शिक्षण; नव्या सहा अभ्यासक्रमांची घोषणा
सांगली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रमही सुरू होणार आहे. बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एआयचा अंगीकार करण्यात आला आहे. यासह सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
विद्युत वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.
आयटीआयमध्ये सध्याचे सर्व अभ्यासक्रम पारंपरिकच आहेत. वेल्डर, फिटर, रेफ्रिजरेशन, मोटर मेकॅनिक, वायरमन आदी शिक्षणक्रम वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारही मिळत आहे. मात्र, बदलत्या काळात सामाजिक व्यवहारात अनेक आधुनिक तंत्रे आली, तरी त्याचे शिक्षण मात्र आयटीआयमध्ये मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन नव्या सहा अभ्यासक्रमांची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
बाजारात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा जमाना सुरू झाला आहे. त्यांचे उत्पादन, देखभाल व दुरुस्तीसाठी तंत्रज्ञांची गरज आहे. हे लक्षात घेऊन विद्युत वाहन व्यवस्थापन शिक्षणक्रम सुरू केला आहे. विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. त्याला सुसंगत ड्रोन तंत्रज्ञान हा अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. त्याशिवाय सोलरचा वाढता वापर व भविष्यातील प्रचंड विस्तार लक्षात घेऊन सोलर तंत्रज्ञ शिक्षणक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स हे अभ्यासक्रमदेखील विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेत समावेश नाही
सांगली जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत सध्या नव्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सांगली आयटीआयमध्ये २५ विविध शिक्षणक्रमांचा समावेश आहे. नव्या काळाशी सुसंगत कॉस्माटोलॉजी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोगामिंग हे शिक्षणक्रम वगळता उर्वरित सर्व शिक्षणक्रम पारंपरिकच आहेत. आता तेथेही नवे कालसुसंगत शिक्षणक्रम सुरू होणार आहेत. मात्र, प्रवेश अर्जामध्ये नव्या सहा शिक्षणक्रमांचा उल्लेख सध्या तरी दिसत नाही.