सांगलीतील उटगीतील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:19 IST2025-07-22T15:18:39+5:302025-07-22T15:19:09+5:30
कटरचा वापर करुन रिंग, कर्णफुले काढली; ६ लाखांवर मुद्देमाल लंपास

सांगलीतील उटगीतील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; दोघे जखमी
जत : उटगी (ता. जत) येथे उटगी- जाडरबोबलाद रस्त्यावर मोईद्दीन शेख व अकबर मुल्ला यांच्या शेतवस्त्यांवर सोमवारी पहाटे धाडसी दरोडा घालण्यात आला. सुमारे १२ ते १५ दरोडेखोरांच्या टोळीने सुमारे चार तास वस्तीवर लूटमार केली. रोख पैसे व दागिन्यांसह ६ लाखांहून अधिक किमतीच्या मुद्देमालाची लूट केली.
दरोडेखोरांनी वस्तीवर झोपलेल्या महिला व पुरुषांच्या मानेवर चाकू लावून ही लुटमार केली. आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे प्रचंड घाबरलेल्या रहिवाशांनी उघड्या डोळ्यांनी ही लूटमार पाहिली. दरोडेखोरांनी १० तोळे सोन्याचे दागिने, तीन मोबाईल व रोख १ लाख २० हजार रुपये लुटून नेले. दोघांना पट्ट्याने व लोखंडी सळीने मारून त्यांचे पाय मोडले. दहशत निर्माण करत महिला व लहान मुलींच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. कानातील रिंगा, कर्णफुले काढण्यासाठी त्यांनी कटरचा वापर केला.
लूटमारीला प्रतिकार करू पाहणाऱ्या साहेबलाल मुल्ला यांच्या डाव्या पायावर दरोडेखोरांनी लोखंडी सळीने वार केला. त्यात मुल्ला यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांच्यावर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरोड्याची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
भीतीचे वातावरण
दरोड्यामुळे उटगी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी आमदार विक्रम सावंत यांनी मुल्ला कुटुंबातील जखमी साहेबलाल मुल्ला यांची ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.