Sangli: भाड्याच्या खोलीवरुन वाद झाला, रागातून डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीचा खून केला

By अविनाश कोळी | Updated: July 4, 2024 15:29 IST2024-07-04T15:29:11+5:302024-07-04T15:29:31+5:30

संशयित पतीला अटक 

Argument over rented room, husband kills wife by hitting her head in anger in vita Sangli | Sangli: भाड्याच्या खोलीवरुन वाद झाला, रागातून डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीचा खून केला

Sangli: भाड्याच्या खोलीवरुन वाद झाला, रागातून डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीचा खून केला

विटा : भाड्याने घेतलेली खोली बदलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून तिचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता विटा येथील खानापूर नाक्यावर घडली. सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, सध्या रा. खानापूर नाका, विटा) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी पती गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, मूळगाव रा. याडहळ्ळी, ता. शोरपुरा, जि. यादगीर, कर्नाटक) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे.

कर्नाटक राज्यातील याडहळ्ळी गावातील गुराप्पा व त्याची पत्नी सलमा हे तिच्या लहान दीड वर्षाच्या मुलासह विटा येथील खानापूर नाक्यावर असलेल्या विजय उथळे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. हे दोघेही पती-पत्नी मोलमजुरी करून संसार चालवीत होते. मात्र, खानापूर नाक्यावर राहण्यास घेतलेली भाड्याची खोली बदलून हजारे मळा किंवा मुल्ला गल्ली येथे दुसरी खोली घेऊन तेथे राहण्यास जाऊ, असे पत्नी सलमा ही पती गुराप्पाला नेहमी सांगत होती; परंतु त्यास गुराप्पा तयार होत नसल्याने या दोघांत वारंवार वाद होत होता.

बुधवारी रात्रीही या कारणावरून पती-पत्नीत जोराचा वाद झाला. त्यावेळी पती गुराप्पा याने रागाच्या भरात बाजूला असलेले लोखंडी खोरे घेऊन पत्नी सलमा हिच्या डोक्यात घाव घातला. हा घाव तिच्या वर्मी बसल्याने सलमा हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळताच उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, महिला उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून सलमा हिचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पती गुराप्पा इकुरोट्टी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये विटा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुराप्पा इकुरोट्टी यास अटक केली आहे.

Web Title: Argument over rented room, husband kills wife by hitting her head in anger in vita Sangli