Ladki Bahin Yojana: पतीने अर्ज केलेला माहीत नव्हते, माफ करा; महिला कर्मचाऱ्यांचे माफीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:01 IST2025-10-07T16:00:42+5:302025-10-07T16:01:18+5:30
बोगसगिरी सापडल्याने पैसे वसूल होणार

Ladki Bahin Yojana: पतीने अर्ज केलेला माहीत नव्हते, माफ करा; महिला कर्मचाऱ्यांचे माफीनामे
सांगली : ‘शासकीय सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला ही चूक झाली. या कृत्याबद्दल माफी करावी’, असे खुलासे या योजनेच्या बोगस लाभार्थींनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आले आहेत.
सरकारी कर्मचारी असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन ग्रामसेविका, पाच आरोग्य सेविका आणि एक महिला शिपाई, अशा नऊ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. प्रशासनाने त्यांना नोटिसा काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी उत्तरे दिली आहेत. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
अशा बोगस लाभार्थींचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला. त्यानुसार राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील १ हजार १८३ महिला कर्मचारी निष्पन्न झाले. यामध्ये सांगलीतील नऊ जणींचा समावेश आहे. खुलाशामध्ये एकीने म्हटले आहे की, योजनेसाठी अर्ज करताना माझे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत होते. दुसरीने म्हटले की, योजनेच्या लाभासाठी कुटुंबीयांनी परस्पर अर्ज केला. त्याची माहिती मला नव्हती, तरीही माझी चूक झाली असून, माफी करावी.
तिसऱ्या महिलेने म्हटले आहे की, नियम व अटींची माहिती नसल्याने अनवधानाने लाभ घेतला.
या सर्व महिला कर्मचारी सुशिक्षित असून, नियमांची माहिती असतानाही १५०० रुपयांसाठी अर्ज केले. त्यांची एक वेतनवाढ रोखली जाणार असून, घेतलेले पैसे वेतनातून परत घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य, सामान्य प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने त्यांचे खुलासे घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवले आहेत. कारवाईच्या आदेशावर आता सीईओंच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे.
ग्रामसेविका, तुम्हीसुद्धा ?
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी निवडीच्या प्रक्रियेत ग्रामसेवकदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होते. जन्माचे दाखले देण्याचे काम ग्रामसेवकांनीच केले. त्यामुळे योजनेचे नियम व अटींची पूर्ण माहिती ग्रामसेवकांना होती, तरीही तिघी ग्रामसेविकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. आता त्या कारवाईच्या बडग्यात सापडल्या आहेत.