Sangli: कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग, गर्भवती कुत्रीवर कुऱ्हाडीने वार; माणसातल्या क्रूरतेने परिसीमा गाठली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:05 IST2025-03-28T19:04:14+5:302025-03-28T19:05:23+5:30
इस्लामपूर : दूध आणण्यासाठी निघालेल्या मालकिणीबरोबर असणाऱ्या अमेरिकन जातीच्या कुत्रीने शेजारच्या कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने रागाच्या भरात ...

Sangli: कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग, गर्भवती कुत्रीवर कुऱ्हाडीने वार; माणसातल्या क्रूरतेने परिसीमा गाठली
इस्लामपूर : दूध आणण्यासाठी निघालेल्या मालकिणीबरोबर असणाऱ्या अमेरिकन जातीच्या कुत्रीने शेजारच्या कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने रागाच्या भरात गर्भवती असलेल्या अमेरिकन कुत्रीवर कुऱ्हाडीने वार करून माणसातल्या क्रूरतेची परिसीमा गाठली. या गंभीर दुखापतीच्या धक्क्याने तिचा गर्भपातदेखील झाला.
इस्लामपूर शहरातील बिरोबानगर परिसरात ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मनीषा शिवाजी नांगरे-पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन रामचंद्र वळसे आणि रूपाली सचिन वळसे (दोघे रा. बिरोबानगर, इस्लामपूर) यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्याराचा वापर यासह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मनीषा पाटील या मंगळवारी आपल्या विस्की नावाच्या अमेरिकन बुली जातीच्या कुत्रीसोबत निघाल्या होत्या. यावेळी सचिन वळसे यांच्या घरासमोर त्यांचे कुत्रे बसले होते. त्यावेळी ही अमेरिकन कुत्री त्याच्यावर भुंकत जवळ गेली होती. त्याचा राग सचिन वळसे याला आला होता.
त्याच रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने या गर्भवती असणाऱ्या कुत्रीच्या मानेवर व पाठीत वार करून गंभीर जखमी केले, तर रूपाली वळसे हिने तुमचे कुत्रे पुन्हा दारात आले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी मनीषा पाटील यांना दिली.
मुक्या प्राण्याबाबत ही घटना घडली असल्याने पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह हवालदार दीपक ठोंबरे, सचिन यादव, राहुल कुंभार यांना घटनास्थळी पाठवत जखमी कुत्रीला येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेत तिचे प्राण वाचवले.