हौसेखातर पाळले, कंटाळा आल्यावर बेवारस सोडून दिले; मिरजेत गणेश तलावातून अमेरिकन कासवाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:46 IST2025-06-04T17:46:03+5:302025-06-04T17:46:21+5:30

तोंडात गळ अडकल्याने जखमी

American tortoise rescued from Ganesh Lake in Miraj | हौसेखातर पाळले, कंटाळा आल्यावर बेवारस सोडून दिले; मिरजेत गणेश तलावातून अमेरिकन कासवाची सुटका

हौसेखातर पाळले, कंटाळा आल्यावर बेवारस सोडून दिले; मिरजेत गणेश तलावातून अमेरिकन कासवाची सुटका

मिरज : मिरजेतील गणेश तलावातून एका अमेरिकन कासवाची प्राणिमित्रांनी मुक्तता केली. तोंडात मासेमारीचा गळ अडकल्याने ते जखमी झाले होते. हे कासव कोणाच्या तरी घरातील पाळीव होते. मात्र, नंतर त्याला तलावात सोडून देण्यात आले होते.

रेड इअर्ड स्लायडर प्रजातीच्या या विदेशी कासवाच्या तोंडात मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारा गळ अडकल्याचे आढळून आले. प्राणिमित्र सागर झांबरे आणि सम्मेद ठाणेदार यांनी त्याला ताब्यात घेतले. सुधीर चौगुले यांच्या माध्यमातून कासवाला सांगलीत ॲनिमल राहत संस्थेकडे सोपविले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश चित्तोडा आणि सहायक दिलीप शिंगाणा यांनी कासवाला सौम्य भूल देऊन त्याच्या तोंडात खोलवर अडकलेला गळ काढून टाकला. त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. प्राणिमित्र किरण नाईक, सचिन साळुंखे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची निगा राखली जात आहे.

प्राणिमित्रांनी सांगितले की, या प्रजातीचे कासव भारतात नैसर्गिकरित्या आढळत नाही. घरात पाळण्यासाठी विदेशातून आयात केले जाते. हे कासवही आयात केलेले असावे. त्याच्या मालकाने हौस भागल्यानंतर किंवा अन्य कारणांनी बेवारस स्थितीत गणेश तलावात सोडून दिले. कासवाची ही जात आक्रमक आहे. ती स्थानिक कासवांसोबत अन्न आणि निवाऱ्यासाठी संघर्ष करते. त्यामुळे जैवसाखळी विस्कळीत होते. हे कासव अन्य जलचरांचे जीव धोक्यात आणते.

मालक आणि विक्रेत्याचा बेजबाबदारपणा

परदेशी जातीच्या या कासवाची वन विभागाकडे नोंद आवश्यक असते. ते निसर्गात सोडून देता येत नाही. कासवाची विक्री करताना संबंधित विक्रेत्याने याची माहिती ग्राहकाला देणे आवश्यक असते. या कासवाच्या बाबतीत ते विकणारा आणि पाळणारा या दोहोंनी बेजबाबदारपणा दाखविल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: American tortoise rescued from Ganesh Lake in Miraj