‘अलमट्टी’ ७२ टक्के भरले, एक लाखाने पाण्याचा विसर्ग; ‘कोयना’, ‘वारणा’ धरणांतही पाणीसाठा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:39 IST2025-07-04T17:39:03+5:302025-07-04T17:39:30+5:30
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

‘अलमट्टी’ ७२ टक्के भरले, एक लाखाने पाण्याचा विसर्ग; ‘कोयना’, ‘वारणा’ धरणांतही पाणीसाठा वाढला
सांगली : जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे; पण ‘कोयना’, ‘वारणा’ धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणे भरू लागली आहेत. ‘कोयना’ ५६ टक्के, तर ‘वारणा’ ७६ टक्के भरले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी १७ फुटांवर गेली असून अलमट्टी धरण ७२ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाने दिली.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये केवळ सरासरी १.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक १६.७ मिलिमीटर पाऊस झाला असून, उर्वरित सर्वच तालुक्यांत दोन ते १ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात पावसाची उघडीप असली तरी ‘कोयना’ आणि ‘वारणा’ धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात ५८.८२ टीएमसी पाणीसाठा झाला असून ५६ टक्के, वारणा धरणात २६.१३ टीएमसी पाणीसाठा असून, धरण ७६ टक्के भरले आहे. अलमट्टी धरणात ९४ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणात ८८.८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ७२ टक्के भरल्यामुळे गुरुवारपासून धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाणीसाठा
धरण - क्षमता/ पाणीसाठा/ टक्के
अलमट्टी - १२३ / ८८.८२ / ७२
कोयना - १०५.२५ / ५८.८२ / ५६
वारणा - ३४.४० / २६.२३ / ७६