Sangli: पलूसच्या युतीचा तिढा कायम, काँग्रेस मात्र आमचं ठरलंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:24 IST2025-11-05T19:23:29+5:302025-11-05T19:24:06+5:30
Local Body Election: इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात

Sangli: पलूसच्या युतीचा तिढा कायम, काँग्रेस मात्र आमचं ठरलंय
पलूस : पलूस नगरपालिकेच्या २० नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक जाहीर झालेली निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून काँग्रेसकडून “आमचं ठरलंय...!” असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे, तर भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीत मात्र नगराध्यक्षपदावरून तिढा सुटत नाही.
भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादीचे नीलेश येसुगडे यांच्या गटात उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला आहे. जिल्हा स्तरावर हा प्रश्न न सुटल्याने आता निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेला असून शुक्रवारी (७ नोव्हेंबर) मुंबईत निर्णायक बैठक होणार आहे.
नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्याने भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, काँग्रेस आणि उद्धवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ झालेला आहे. तालुक्यात आचारसंहित जाहीर होताच पक्षांतर्गत बैठकांना वेग आला असून राजकीय घडमोडींना सुरुवात झालेली आहे. सर्वच पक्षांकडून इच्छूकांचा अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून. इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
बैठकीनंतर स्पष्ट होणार
शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाचे वजन वाढले असले तरी संग्राम देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांच्यातील मतभेद कायम आहेत. त्यामुळे युती टिकते की तुटते, हे आगामी बैठकीनंतर स्पष्ट होईल.
मागील निवडणूक बलाबल :
- काँग्रेस -१२ नगरसेवक व नगराध्यक्ष
- स्वाभिमानी विकास आघाडी (सध्या राष्ट्रवादी अजित गट)-४ नगरसेवक
- भाजप - १ नगरसेवक
मागील निवडणुकीत ८ प्रभाग १७ नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशी एकूण संख्या = १८ होती.
यावेळी १० प्रभाग, २० नगरसेवक, १ नगराध्यक्ष, एकूण =२१ संख्या आहे.