सांगली जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषदांचे रण पेटले; स्वबळाची खुमखुमी अन् युतीचीही तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:45 IST2025-11-17T18:44:18+5:302025-11-17T18:45:09+5:30
राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांत एकमेकांचे हुकमी मोहरे खेचून घेण्यासाठी शर्यत सुरू

सांगली जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषदांचे रण पेटले; स्वबळाची खुमखुमी अन् युतीचीही तयारी
संतोष भिसे
सांगली : नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होताच राजकीय कार्यकर्त्यांत एकमेकांच्या जिरवाजिरवीला सुरुवात झाली आहे. निवडणूक लढवताना स्वबळाची खुमखुमी उफाळून आली असून, गरजेनुसार युतीचीही तयारी उमेदवारांनी ठेवली आहे. एकीकडे युती-आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असतानाच दुसरीकडे स्वतंत्र लढाईच्या गर्जनाही केल्या जात आहेत.
पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषदांची हातघाई सुरू झाली असून, वाटाघाटी आणि तडजोडींना बहर आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आरोप-प्रत्यारोपांनी एकमेकाची चिंध्या करणारे नेते आता नगरपालिकेसाठी गळ्यात गळे घालत आहेत. विशेषत: जत, पलूस, शिराळा, विटा, आटपाडी, आष्टा येथील राजकारणाचे रण सध्या जोरात पेटले आहे. जतमध्ये राजकीय कोलांडउड्या खूपच जोरात आहेत. तेथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांत एकमेकांचे हुकमी मोहरे खेचून घेण्यासाठी शर्यत सुरू आहे.
जातीयवादाच्या राजकारणाचा प्रभाव असणाऱ्या येथील राजकारणात नेत्यांच्या प्रभावाचा करिष्मादेखील बाजी मारून जाणारा आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना भाजप काय करणार? याची उत्सुकता आहे. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मुख्य घटक असल्याच्या स्थितीत शिराळ्यामध्ये मात्र युतीला तिलांजली देण्यात आल्याचे दिसत आहे. सुरुवातीला स्वबळाची खुमखुमी दाखवत असतानाच आता गळ्यात गळे घालून नेतेमंडळी मतदारांसमोर जात आहेत. पलूसमध्ये महायुती काही प्रमाणात अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्थात, तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपची भूमिका महत्त्वाची आगे.
महायुती, महाविकास आघाडी भंगली
महायाुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष कोणत्याच निवडणुकीत एकत्र आल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी भाजप शिंदेसेना, काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीपुरती महायुती व महाविकास आघाडी भंगल्याचे चित्र आहे. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जेथे फायदा तेथे स्वतंत्र आणि जेथे गरज तेथे युती-आघाडी हा मंत्र स्थानिक नेत्यांनी तंतोतंत पाळल्याचे दिसत आहे.
निकालानंतर युती-आघाडीची पुन्हा हातमिळवणी
निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले पक्ष निकालानंतर मात्र सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी किंवा महायुती रिंगणात एकत्र दिसत नसली तरी खुर्चीसाठी संख्याबळाची जुळवाजुळव करताना त्यांना हातमिळवणी करावी लागण्याची चिन्हे आहेत. नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ नेते हस्तक्षेपकरून स्थानिक स्तरावर आघाडी किंवा युती करतील हे निश्चित आहे.