'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:32 IST2025-09-05T13:31:44+5:302025-09-05T13:32:09+5:30
शेतकऱ्यांकडून १९५० हरकती

'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी
सांगली : शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेला घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत तसे निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना प्रति पाठविल्या आहेत. या निकालपत्राची होळी दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.
उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असून देखील सरकारने जमीन अधिग्रहणाचे काम चालूच ठेवले आहे. सरकारने भूसंपादनासाठी केवळ २० हजार कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
हरकती सादर करत असताना शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरिता केलेला खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचे होणारे नुकसान आदींचा विचार करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. नदीकाठावरील भागात तयार होणारी पूरसदृश्य परिस्थिती या सर्व नुकसानीचे मुद्दे प्रांताधिकारी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या. त्यांनी यापैकी कोणत्याही बाबींचा विचार न करता या हरकती फेटाळल्या आहेत. याचा निषेध करून दिलेल्या निकालपत्राच्या प्रतीची मंगळवारी (दि.९) सांगलीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुनील पवार, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमाना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम, संतोष लोहार, नितीन झांबरे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांकडून १९५० हरकती
शक्तिपीठ महामार्ग बाधित जिल्ह्यातील एक हजार ९५० शेतकऱ्यांच्या हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी बहुतांशी हरकती मोबदला, शक्तिपीठ महामार्ग नको, अशाच आशयाच्या होत्या. मिरज प्रांताधिकारी यांच्याकडून या सर्व हरकती फेटाळल्या आहेत, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली.