Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:52 IST2025-08-14T18:51:38+5:302025-08-14T18:52:27+5:30

समितीकडून जागा शासकीय असल्याचा दावा

Ahilyadevi Holkar's statue erected in Atpadi at midnight Controversy over the location | Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद

Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद

आटपाडी : आटपाडी शहरातील दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या आवारातील बोटॅनिकल गार्डनमध्ये मंगळवारी मध्यरात्री अंधारात अज्ञात व्यक्तींनी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेनंतर पुतळ्याच्या जागेबाबत मालकीचा वाद आणि अतिक्रमणाचे आरोप केले आहेत.

आटपाडी एज्युकेशन सोसायटीने पोलिस निरीक्षक, आटपाडी यांना दिलेल्या निवेदनात पुतळा त्यांच्या गार्डनमध्ये चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याचे नमूद केले आहे. पुतळा तातडीने हलवून पोलिस संरक्षणात सुरक्षित स्थळी ठेवावा, अशी मागणी सोसायटीने केली आहे. सोसायटीचे म्हणणे आहे की, शैक्षणिक संकुल परिसर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपणबंद असून, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय पुतळ्याची स्थापना केली आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि महाविद्यालय प्राचार्यांना दिलेल्या निवेदनांतून वेगळी बाजू मांडली आहे. 

समितीच्या मते, पुतळा ज्या ठिकाणी बसवला आहे ती सरकारी पडजागा (गट क्र. ४२०५/३ क्षेत्रफळ ०३.०१.०० हेक्टर) असून, तिच्यावर सोसायटीने अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभी केली आहे. पत्रकार परिषदेत समितीने सातबारा दाखला सादर करून संबंधित जागेची मालकी माहिती मांडली समितीचा आरोप आहे की, सध्या या सर्व जमिनीवर सोसायटीचा कब्जा आहे आणि पुतळ्याभोवती उभारलेल्या बेकायदेशीर कम्पाऊंडमुळे नागरिकांना पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. या पत्रकार परिषदेस रासपाचे माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, भाजप युवा नेते उमाजी चव्हाण, रासपाचे शुभम हाके, विशाल सरगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

उपस्थितांनी पुतळ्याची स्थापन कोणी केला माहीत नाही, मात्र ज्या ठिकाणी पुतळा बसवला आहे तेथे संस्थेने अतिक्रमण केले असून, तेथील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. अहिल्यादेवींच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, जयवंत सरगर, जे. जे. जानकर, लक्ष्मण सरगर, विष्णुपंत अर्जुन, भाजपाचे तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले, चंद्रकांत काळे, सागर तळे यांच्यासह धनगर समाजातील युवकांनी पुष्पहार अर्पण करत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

अतिक्रमण तत्काळ काढा

समितीने तहसील कार्यालय व नगरपंचायतीकडे दिलेल्या निवेदनांमधून पुतळ्याभोवतालचे अतिक्रमण तत्काळ काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. पुतळा कोणी बसवला हे माहीत नसले तरी, ज्या ठिकाणी बसवला आहे तेथील अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे समितीने स्पष्ट केले.

प्रशासनाकडे सर्वांचे लक्ष

या प्रकरणावरून पोलिस, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पत्रव्यवहार सुरू असून, प्रशासनाची पुढील भूमिका या वादाचे भवितव्य ठरवणार आहे. या घटनेमुळे आटपाडी शहरात वातावरण तापले आहे.

Web Title: Ahilyadevi Holkar's statue erected in Atpadi at midnight Controversy over the location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली