बनावट स्टॅम्पपेपर छापण्याचाही अहद शेखचा डाव, सांगली शहर पोलिसांच्या तपासात मिळाले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:45 IST2024-06-14T11:45:13+5:302024-06-14T11:45:54+5:30
हुशारीचा गैरवापर

बनावट स्टॅम्पपेपर छापण्याचाही अहद शेखचा डाव, सांगली शहर पोलिसांच्या तपासात मिळाले पुरावे
सांगली : भारतीय चलनी नोटाप्रमाणे ५० रुपयांची हुबेहूब दिसणारी बनावट नोट मिरजेच्या अहद शेखने बनवली. छापखान्यातून त्याने सुमारे ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्या. एवढ्यावरच न थांबता त्याने दहा आणि २० रुपयांच्या नोटांचे नमुने बनविले होते. सर्वांत धक्कादायक म्हणजे त्याने बनावट स्टॅम्पपेपर छापण्याचा प्रयत्न केला होता. स्टॅम्पपेपरप्रमाणे दिसणारा कागद आणून ठेवला होता. त्यामध्ये फारसे यश न मिळाल्यामुळे तो पुन्हा प्रयोग करत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
मिरजेतील अहद महंमद अली शेख (वय ४४, रा. शनिवार पेठ, मिरज) याला बनावट नोटा प्रकरणात सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा कलर प्रिंटर, लॅपटॉप तसेच पन्नास रुपयांच्या एक लाख ९० हजारांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद, शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने सुमारे ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.
सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक गस्त घालत असताना आकाशवाणी केंद्राजवळ सापळा रचून अहद शेख याला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतल्यानंतर ५० रुपयांच्या बनावट ७५ नोटा आढळल्या. चौकशीत मिरजेत छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आले होते. शेख याचे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता असून ७० रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. शेख याला ‘ब्रेन स्ट्रोक’ चा त्रास असल्यामुळे पोलिसांना खोलवर तपास करण्यात अडथळे येत आहेत.
एक वर्षापासून शेख हा ५० रुपयांच्या बनावट नोटा छापत होता. त्याच्याकडे अद्यावत कलर प्रिंटर आढळला आहे. या प्रिंटरवर आजअखेर किती कागदांची छपाई याची माहिती मिळते. त्यावरून शेख याने ४० लाखाच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती मिळाली आहे. ५० च्या नोटेबरोबरच त्याने २० आणि १० ची बनावट नोट चलनात आणल्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तपासात स्टॅम्प पेपर मिळाला आहे तसेच स्टॅम्प पेपरसाठी जो कागद वापरला जातो तो मिळाला आहे. स्टॅम्प पेपर स्कॅन करून छपाईचा प्रयत्न केला होता. परंतु त्यामध्ये फारसे यश आले नाही परंतु भविष्यात त्याचे प्लॅनिंग होते.
पोलिस कोठडीत वाढ
अहद शेख याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपासासाठी पोलिस कोठडी वाढवून मागितली. न्यायदंडाधिकारी यांनी शेख याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
हुशारीचा गैरवापर
कलर प्रिंटर मशीनमध्ये चलनी नोट स्कॅन करून त्याची छपाई करण्यास प्रतिबंध करणारे अद्यावत तंत्र वापरले आहे. परंतु शेख याने लॅपटॉपवर स्कॅन केलेली बनावट नोट घेऊन लॅपटॉपवरून कलर प्रिंटर जोडून छपाई केली आहे. हुशारीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे दिसून येते.