सांगलीत कृषी विभागाच्या निरीक्षकास ३० हजाराची लाच घेताना अटक

By घनशाम नवाथे | Updated: April 24, 2025 17:42 IST2025-04-24T17:42:12+5:302025-04-24T17:42:41+5:30

सांगली : शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष ...

Agriculture Department Inspector arrested in Sangli while accepting a bribe of Rs 30000 | सांगलीत कृषी विभागाच्या निरीक्षकास ३० हजाराची लाच घेताना अटक

सांगलीत कृषी विभागाच्या निरीक्षकास ३० हजाराची लाच घेताना अटक

सांगली : शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी (वय ४६, सध्या रा. गणेश नमन अपार्टमेंट, दालचिनी हॉटेलसमोर, धामणी रस्ता, विश्रामबाग, मूळ रा. गलांडेवाडी नं.१, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दुपारी ही कारवाई केली.

तक्रारदार यांनी कडेगाव एमआयडीसी प्लॉट नंबर बी - ८४, शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी २०२३ मध्ये एमआयडीसी कडेगावसोबत करार केला आहे. कडेगाव एमआयडीसी यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदार यांनी पॅरागॉन ॲग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन केली. त्याचे बांधकाम पूर्ण करून दि. १६ जुलै २०२४ रोजी बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र कडेगाव एमआयडीसी कार्यालयाकडून प्राप्त केले होते. तक्रारदार यांनी या जागेवर शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (DRC) मिळावे यासाठी एका खासगी एजंटामार्फत दि. २२ एप्रिल रोजी फाईल तयार करून घेतली होती. 

प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी फाईल पुणे येथील कार्यालयास पाठवावी लागते. तत्पूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांच्याकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो. हा अहवाल मिळण्यासाठी तक्रारदार दि. २३ रोजी जिल्हा कृषी विभाग येथे गेले. तेव्हा निरीक्षक चौधरी याने इमारतीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला.

तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर गुरूवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कृषी कार्यालय परिसरात सापळा रचला. निरीक्षक चौधरी याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रुपये लाच घेतली असता रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, विनायक भिलारे, अंमलदार ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, वीणा जाधत्त, विठ्ठलसिंग रजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Agriculture Department Inspector arrested in Sangli while accepting a bribe of Rs 30000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.