Sangli: आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये झेडपी निवडणुकीचे राजकारण तापले!, सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:33 IST2025-08-28T18:31:48+5:302025-08-28T18:33:19+5:30
महायुती-महाविकास आघाडीची कसोटी

संग्रहित छाया
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, सभापती आणि गट-गणांच्या आरक्षणाकडे लागले आहे. संभाव्य आरक्षण कोणते ठरणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा व कूटनीती सुरू झाली असून, इच्छुकांनी आधीच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी २०१६-१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू झाला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कोणती निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी आरक्षणाची सोडत मुंबईत होणार असून, त्याच वेळी मतदारयाद्याही जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी होते. सध्याच्या ६१ गट व १२२ गणांच्या नव्या रचनेत गावांच्या सीमांकनात झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.
सुरक्षित गट-गणांवर इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून, संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी आठवड्यांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडतही लवकरच निघणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसची धास्ती आणि मोर्चेबांधणी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पायाभूत ताकद असलेल्या काँग्रेसने जूनमध्येच पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा दबाव वाढला आहे. काँग्रेसची स्थानिक ताकद आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांचा प्रभाव यामुळे अनेक गट-गणांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
आरक्षणानंतर तापणार वातावरण!
जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. कोणत्या गट-गणाचे आरक्षण कोणाला अनुकूल ठरेल आणि कोणाचे राजकीय गणित बिघडेल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
महायुती-महाविकास आघाडीची कसोटी
या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे; मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत मतभेद प्रकर्षाने जाणवत आहेत. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा जागावाटपात महाविकास आघाडीचे गणित काही प्रमाणात बिघडले होते; पण सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील एकत्रित प्रचाराची रणनीती आखत आहेत; पण जिल्ह्यात महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांत त्याचे पडसाद उमटत आहेत.