बिबट्यानंतर सांगलीत कोल्ह्याचा वावर; वनविभागाने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 21:29 IST2025-11-25T21:29:31+5:302025-11-25T21:29:42+5:30
कोल्हा आढळल्याने शहरात खळबळ.

बिबट्यानंतर सांगलीत कोल्ह्याचा वावर; वनविभागाने घेतले ताब्यात
सांगली: शहरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असतानाच, आता शंभर फुटी रस्त्यावरील डी-मार्टच्या मागील बाजूला कोल्हा आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच, वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला ताब्यात घेतले. बिबट्यानंतर आता शहरात कोल्हा दिसल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शंभर फुटी रस्त्यावरील डी-मार्टच्या मागील बाजूस एक कोल्हा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो कोल्हा असल्याची खात्री पटनंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.
अधिकाऱ्यांनी कोल्ह्यास वनविभागात नेत त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले. मात्र गेल्या आठवड्यात बिबट्या आणि आता कोल्हा यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनसेवक सचिन साळुंखे, वनपाल सुधीर सोनवले, चालक भारत भोसले, प्राणिमित्र मंदार शिंपी, मेघदीप कुदळे, रोहन हर्षद, नीलेश पाथरवट, राहुल घोरपडे यांचा सहभाग होता.