विटा पालिकेत २९ वर्षांनंतर मिळणार ओबीसी महिलेला नगराध्यक्षपदाची संधी, महायुतीतच होणार लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:54 IST2025-10-07T18:52:06+5:302025-10-07T18:54:05+5:30
ओबीसी विरुद्ध नवीन ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याचे संकेत

विटा पालिकेत २९ वर्षांनंतर मिळणार ओबीसी महिलेला नगराध्यक्षपदाची संधी, महायुतीतच होणार लढत
दिलीप मोहिते
विटा : विटा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. या सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण जाहीर झाल्याने तब्बल २९ वर्षांनंतर ओबीसी महिला नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. मात्र, यावेळी सत्ताधारी गटातील भाजप नेते ॲड. वैभव पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास बाबर गट या महायुतीतच प्रमुख लढत होणार आहे.
गेल्या ५० वर्षांपासून विटा नगरपालिकेवर माजी आमदार सदाशिवराव पाटील घराण्याची एकहाती सत्ता आहे; परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बाबर यांना शहरात मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे यावेळी आमदार सुहास बाबर व सत्ताधारी गटाचे नेते ॲड. वैभव पाटील यांच्यात लढत तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत. १९९६ मध्ये विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ओबीसी महिला प्रवर्गातून भागीरथी टेके यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता तब्बल २९ वर्षांनंतर ओबीसी समाजाची महिला विट्यात नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहे.
विटा शहराचे एकूण मतदान ४३ हजारांच्या आसपास आहे. विट्यात मराठा समाजाचे अधिक वर्चस्व आहे. देवांग समाजाचे १२ हजारांच्या जवळपास मतदान गृहीत धरले जाते. अनुसूचित जाती मतदारांची संख्याही ५ ते ७ हजार आहे. मुस्लीम, धनगर, नाभिक आणि लिंगायत समाजाचेही तुल्यबळ मतदार आहेत.
आता विटा पालिकेसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्यानंतर ज्यांनी कुणबी दाखले घेतले आहेत ते सर्वजण आता ओबीसी या प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे या आगामी निवडणुकीत विटा नगरपालिकेसाठी ओबीसी विरुद्ध नवीन ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याचे संकेत आहेत.