Sangli: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:35 IST2025-07-16T18:34:50+5:302025-07-16T18:35:00+5:30

पीडित मुलगी ही गरोदर राहिली. त्यांना त्यातून एक मुलगाही झाला. मात्र त्याने लग्न केले नाही

Accused gets 20 years in prison for raping minor girl on the pretext of marriage | Sangli: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षांचा कारावास

Sangli: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षांचा कारावास

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणीच्या खटल्यातील आरोपीस दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी त्याला २० वर्षे सश्रम कारावास आणि १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ऋत्विक आप्पासाहेब कोळी (वय २२, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित अल्पवयीन मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील यांनी फिर्यादी मुलीतर्फे काम पाहिले.

पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी ऋत्विक कोळी याने एप्रिल २३ मध्ये तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचे अपहरण केले होते. त्यानंतर तिला विजापूर येथे सोबत ठेवून खोली घेऊन भाड्याने राहू लागला. तेथे कोळी याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यातून पीडित मुलगी ही गरोदर राहिली. त्यांना त्यातून एक मुलगाही झाला. मात्र त्याने लग्न केले नाही. त्यामुळे पीडित मुलीने पोलिसात त्याच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर अपहरण आणि बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्या. थत्ते यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे ॲड. रणजीत पाटील यांनी ६ साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलीसह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष यादव व इतरांच्या साक्षी ग्राह्य मानून न्या. थत्ते यांनी आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्याकामी पैरवी अधिकारी हवालदार उत्तम शिंदे, चंद्रशेखर बकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

Web Title: Accused gets 20 years in prison for raping minor girl on the pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.