Sangli: ईदनिमित्त गावी जाताना काळाचा घाला, मिरजेतील बेकरी व्यावसायिक दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:48 IST2024-04-11T12:47:16+5:302024-04-11T12:48:26+5:30
मिरज : मिरजेतील बेकरीचालक मुनावर टी. पी. (वय ४९) व त्यांची पत्नी जमेरा टी. पी. (वय ४३) यांचा कर्नाटकात ...

Sangli: ईदनिमित्त गावी जाताना काळाचा घाला, मिरजेतील बेकरी व्यावसायिक दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
मिरज : मिरजेतील बेकरीचालक मुनावर टी. पी. (वय ४९) व त्यांची पत्नी जमेरा टी. पी. (वय ४३) यांचा कर्नाटकात उडपीजवळ भीषण अपघातातमृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा सोहेल (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. ईदनिमित्त केरळमध्ये गावी जात असताना मंगळवार, दि. ९ राेजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.
केरळमधील तलचेरी (जि. कुन्नूर) येथील मुनावर टी. पी. मिरजेतील मंगळवार पेठेत गेली तीस वर्षे बॉम्बे बेकरी चालवीत होते. बेकरी व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविला होता. दरवर्षी ईद सणानिमित्त मुनावर कुटुंबीय गावी केरळला जाते. त्यानुसार मंगळवारी सकाळी मुनावर, त्यांची पत्नी जमेरा व मुलगा सोहेल हे तीनजण माेटारीतून (क्र. पीवाय ०३ बी ५५२६) गावी केरळला चालले होते.
दुपारी ३ वाजता उडपीजवळ कुंदापूर येथे भरधाव मोटार रस्त्यावर उलटल्याने जमेरा यांचा जागीच मृत्यू झाला. मुनावर व त्यांचा मुलगा साेहेल गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत उडपी येथील रुग्णालयात दाखल केलेल्या मुनावर यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. तर मुलगा सोहेल याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे सांगण्यात आले. मुनावर यांची मुलगी तामिळनाडूत शिकत आहे. मुनावर दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.