Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:35 IST2025-02-17T14:32:58+5:302025-02-17T14:35:28+5:30
उत्तम जानकर येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील ...

Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर
उत्तम जानकर
येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील (वय ३४, रा. नागराळे, ता. पलुस) असे मृताचे नाव आहे. विजापूर- गुहागर रोडला येळावी ता. तासगाव हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पलुस येथील बॉम्बे स्टील उद्योग समूहाचे मालक भगवान महादेव डाळे यांच्या मालकीची कार क्रमांक (MH १०- BM-११) घेऊन कामानिमित्त चालक धैर्यशील हे पलूसकडून सांगलीकडे निघाले होते. विजापूर- गुहागर मार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एका शेडवर आदळुन कार शेतात पलटी झाली. यात चालक धैर्यशील जागीच ठार झाला. तर गाडीचे मोठे नुकसान झाले असून शेडचा चकाचूर झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की कारने चक्काचूर झाल्याने चालकास बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना कटावणिचा वापर करावा लागत होता. घटनास्थळाचा पंचनामा झाला असून तासगाव पोलीस स्टेशन कडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालक धैर्यशील पाटील यांना दोन लहान मुले असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या नागराळे गावावर व पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली.