Sangli: विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिवरेच्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:39 IST2024-12-13T16:38:18+5:302024-12-13T16:39:13+5:30
जीवंत काडतुसासह पिस्तूल जप्त : भिवघाट रोडवर एलसीबीची कारवाई

Sangli: विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिवरेच्या तरुणाला अटक
दिलीप मोहिते
विटा : विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी किशोर विलास जाधव (वय २२, रा. हिवरे, ता. खानापुर) या तरुणास अटक करण्यात आली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री बेनापूर गावच्या हद्दीत ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पिस्तूल व जीवंत काडतूस असा ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हिवरे येथील किशोर जाधव हा तरूण विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी गुरूवारी रात्री भिवघाटजवळ करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणारे रोडवर बेनापूर गावचे हद्दीत एका हॉटेलच्यासमोर सापळा लावला.
त्यावेळी संशयीत किशोर जाधव तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला हटकले. त्यावेळी तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ ५० हजार रुपये किंमतीचे एक लोखडी धातूचे, सिल्व्हर रंगाचे, मॅगझीन असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व ५०० रूपये किंमतीचे एक जीवंत काडतूस असा सुमारे ५० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला.
याप्रकरणी संशयित किशोर जाधव यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शेंडकर पुढील तपास करीत आहेत.