Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:29 IST2025-12-25T17:28:48+5:302025-12-25T17:29:07+5:30
पत्नी कॉलेजच्या आवारातच होत्या. घटना कळाल्यानंतर त्या पतीकडे धावल्या. ईश्वरपूर येथील घटना

Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
शिरटे : जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं. त्यांच्या सुखी संसारानं नुकताच उंबरठा ओलांडला होता. मात्र, दीड महिन्याच्या या संसारात नियतीने वेदनांचा कल्लोळ मांडला. महाविद्यालयात मुलांच्या कबड्डी स्पर्धा घेणाऱ्या तरुण प्राध्यापकाचा मैदानातच हार्ट अटॅकने मृत्यू होताच प्रेमविश्वात रमलेली जोडी तुटली अन् महाविद्यालयासह सारं गाव हळहळलं.
शिरटे (ता. वाळवा) येथील किरण संभाजी देसाई (वय ३०) हे ईश्वरपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करीत होते. महाविद्यालयातच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे किरण हे बुधवारी सकाळी महाविद्यालयात गेले होते. तेथे कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या. मैदानावर स्पर्धांचे नियोजन करतानाच किरण यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या.
त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले, मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. दीड महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या किरण यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह संपूर्ण गावांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
पत्नी जवळ असतानाच धक्का
भर मैदानात ज्यावेळी किरण यांना हार्ट अटॅक आला त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रा. प्राजक्ता देसाई कॉलेजच्या आवारातच होत्या. त्यांना लागलीच ही घटना कळाल्यानंतर त्या पतीकडे धावल्या. किरण यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे पत्नीला सांगण्यात आले. मात्र, लगेचच मृत्यूची बातमी कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला.
आई-वडिलांवर आघात
एकुलत्या एका मुलाच्या लग्नानंतरचे सुखाचे स्वप्न डोळ्यांत घेऊन जगणाऱ्या आई-वडिलांना या घटनेने मोठा धक्का बसला. त्यांच्या अपेक्षांचा आधारस्तंभ कोसळल्याने त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू अखंडित वाहत होते.