बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:01 PM2024-01-18T14:01:46+5:302024-01-18T14:02:18+5:30

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्क्सच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ...

A young man in Peth was killed out of anger for not marrying his sister, the attacker was arrested | बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक 

बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक 

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्क्सच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास महादेववाडी येथील २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. बहिणीशी लग्न लावून दिले नाही याचा राग मनात धरून हल्लेखोराने हे कृत्य केले. संशयित हल्लेखाेरास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सुहास सुरेश कदम (वय २७, रा. महादेववाडी, ता. वाळवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अक्षय ऊर्फ ओमकार अर्जुन पाटील (रा. नेर्ले) हा संशयित हल्लेखोर आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस उपअधीक्षक थोरबोले, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर हल्लेखोर अक्षय पाटील हा तत्काळ पोलिसांच्या हाती लागला.

मृत सुहास कदम याचा शेतीसह वाहन व्यवसाय होता. अक्षय पाटील हा त्याच्याकडील वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यातून त्याने सुहास याच्याकडे ‘तुझ्या बहिणीशी माझे लग्न लावून दे’ असा तगादा लावला होता. अक्षय हा फोन करून सुहासच्या बहिणीस त्रास देत होता. त्यावर सुहासने अक्षयला दोनवेळा ताकीद दिली होती. त्याचा राग अक्षयच्या मनात होता. वर्षभरापूर्वी सुहासच्या बहिणीचे लग्न झाले आहे. तरीही अक्षय तिला फोन करून त्रास देतच होता.

मंगळवारी सायंकाळी सुहास कदम हा पेठनाका येथे आला होता. त्याची हल्लेखोर अक्षयबरोबर भेट झाली. तेथून दोघे त्याच सेवा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेले. तेथून बाहेर पडल्यावर दोघे काही अंतरावर आले. यावेळी अक्षयने त्याच्याशी ‘तुझ्या बहिणीचे लग्न माझ्याशी का लावून दिले नाहीस?’ असे म्हणून वाद सुरू केला. रागाने पेटलेल्या अक्षयने आपल्याकडील कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून त्याने सुहासच्या छातीवर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूने कमरेत वरच्या बाजूला दोन वार केले. हे दोन्ही वार वर्मी बसल्याने सुहास तेथेच कोसळून रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला.

परिसरातील नागरिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत आपत्कालीन रुग्णावाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उशिरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. विवेक जयवंत पाटील (३०, रा. इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक सागर वरुटे अधिक तपास करत आहेत.

Web Title: A young man in Peth was killed out of anger for not marrying his sister, the attacker was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.