Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा सलगरेत कोयत्याने खून; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:24 IST2022-08-04T13:30:48+5:302022-08-04T14:24:21+5:30
हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले.

मृत - संदीप आवळेकर
श्रीनिवास नागे
सांगली : प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील अरळीहट्टी (ता. अथणी, जि. बेळगाव) गावातील तरुणाचा सलगरे (ता. मिरज) गावच्या हद्दीत डोक्यावर, पोटावर, पाठीवर कोयत्याने सपासप वार करीत चौघांनी निर्घृण खून केला. संदीप रामराव आवळेकर (वय ३३) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रामू जाधव (रा. अरळीहट्टी) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी) व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा संशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत. ही घटना काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संदीप आवळेकर आणि फिर्यादी दिनकर जाधव अरळीहट्टी गावाजवळच्या सलगरे येथे रुग्णालयात आले होते. उपचार करून दोघे दुचाकीवरून गावी अरळीहट्टीकडे रात्री नऊच्या सुमारास निघाले होते. दिनकर जाधव गाडी चालवत होते, तर आवळेकर मागे बसले होते.
यावेळी पाठीमागून दोन दुचाकींवरून चौघे हल्लेखोर आले. त्यातील आकाश याने कोयत्याने आवळेकर यांच्या डोक्यात वर्मी घाव घातला. ‘आई गं, मेलो’ असे किंचाळत आवळेकर खाली पडले व गावच्या दिशेने पळू लागले. यावेळी आकाश जाधव, रामू इंगळे व अन्य दोघांनी पाठलाग केला. आवळेकर ठेच लागून पडल्यावर डोक्यात, पोटावर, पाठीवर सपासप वार करीत त्यांचा खून केला.
हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी घटनास्थळी जत विभागीय अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली. फरारी दोघांना शोधण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.