खानापूर येथील जवानाचे सियाचिनमध्ये निधन, शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 20:22 IST2023-01-20T20:21:54+5:302023-01-20T20:22:04+5:30
जयसिंग (बाबू) भगत यांच्यावर खानापूर येथे शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

खानापूर येथील जवानाचे सियाचिनमध्ये निधन, शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
खानापूर - खानापूर येथील जवान नायब सुभेदार जयसिंग ( बाबू ) शंकर भगत (वय ४० ) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिनमध्ये निधन झाले. त्यांच्यावर खानापूर येथे शनिवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
खानापूर येथील जवान जयसिंग (बाबू) भगत हे सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वीच सियाचिन येथे बर्फ वृष्टी झाली होती. त्यावेळी भगत झोपेत होते. झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोमात गेले. हे सकाळच्या वेळी त्यांच्या सहकाऱ्याच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी त्यांना तत्काळ सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले.
शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव खानापूर येथे आणण्यात येणार असून खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत असलेल्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.