सांगलीत पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सात लाख रुपयांची खंडणीही उकळली
By शरद जाधव | Updated: February 1, 2023 23:14 IST2023-02-01T23:14:05+5:302023-02-01T23:14:34+5:30
कोळी कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच त्याच्यावर अत्याचार, खंडणी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सांगलीत पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सात लाख रुपयांची खंडणीही उकळली
सांगली : शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. केवळ अत्याचारच नव्हे तर धाक दाखवून पीडितेकडून सात लाख रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. स्वप्निल विश्वास कोळी (वय ३९, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे संशयित पोलिसाचे नाव आहे. कोळी कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच त्याच्यावर अत्याचार, खंडणी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अल्पवयीन पीडिता ही शहरातील एका उपनगरात राहण्यास आहे. जानेवारी २०२२ दरम्यान स्वरूप चित्रमंदिरानजीक एका वस्तीत एका महिलेकडे पीडिता राहण्यास होती. त्यावेळी संशयित कोळी याने पीडितेच्या घरात घुसत पीडितेचा विरोध धुडकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने अत्याचार केले.
अत्याचार केल्यानंतर कोळी याने पीडितेकडून दोन लाख, तर पुन्हा वस्तीवर पोलिसांचा छापा पडणार होता, त्याची अगोदर माहिती दिल्याबद्दल पाच लाखांची मागणी करत पैसे घेतले होते.
पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खंडणी वसुलीचा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत कारवाईला सुरुवात केल्याचे समजते.
सध्या पीडिता ही एका बालसुधारगृहात असून तिचा यापूर्वीही जबाब घेण्यात आला होता. याशिवाय मंगळवारी पुन्हा पीडितेची फिर्याद घेऊन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कोळी याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अजित टिके करीत आहेत.
कोळीला पोलिस कोठडी -
बुधवारी कोळीला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.