Sangli: कुंडल येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताने मोबाईल विकला, अन् प्रकरणाचा उलगडा झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:11 IST2025-01-25T12:11:34+5:302025-01-25T12:11:55+5:30
पोलिसांकडून संशयित ताब्यात

Sangli: कुंडल येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताने मोबाईल विकला, अन् प्रकरणाचा उलगडा झाला
कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथे ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत कुंडल पोलिसांनी संशयित हरी बबन सानप (वय ३५, रा. कासेवाडी, ता. आष्टी, जी. बीड) याला ताब्यात घेतले.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी (वय ९) ऊसतोडणी कामगार आई-वडील यांच्यासोबत कुंडल येथे राहत आहे. दि. २१ रोजी सकाळी आई-वडील ऊस तोडणीसाठी गेले होते आणि मुलगी झोपडीत एकटीच असल्याची संधी साधून दुपारी १२ च्या सुमारास हरी सानप याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची त्याने भ्रमणध्वनीवर चित्रफीत केली. दुसऱ्या दिवशी संशयिताने त्याचा मोबाइल दुसऱ्या इसमाला विकल्यानंतर त्यामध्ये ही चित्रफीत पाहिली असता ती त्याने पीडित मुलीच्या वडिलांना दाखवली. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.
दि. २२ रोजी बीड येथे पळून गेलेल्या संशयिताला जाब विचारायला पीडितेचे वडील गेले होते. यावरून पीडितेच्या वडिलांनी दि. २३ रोजी रात्री उशिरा कुंडल पोलिसात संशयित हरी सानपची तक्रार दिली. त्यानुसार कुंडल पोलिसांनी बीड येथून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यावर पोक्सो आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपअधीक्षक सचिन थोराबोले, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील हे करीत आहेत.