जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडले, ४० तोळे सोने काढून घेतले; कोल्हापुरातील सासरच्या चौघांवर गुन्हा
By अविनाश कोळी | Updated: January 11, 2025 18:00 IST2025-01-11T17:59:21+5:302025-01-11T18:00:02+5:30
इस्लामपूर : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली ...

जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडले, ४० तोळे सोने काढून घेतले; कोल्हापुरातील सासरच्या चौघांवर गुन्हा
इस्लामपूर : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. तक्रारीनुसार जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडत लग्नात घातलेले ४० तोळे सोन्याचे दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले. आणखी वीस लाखाची मागणी करीत त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली. हा प्रकार जून २०२१ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.
याबाबत विवाहिता मानसी नितीन देसाई (वय ३१, रा. अपूर्वानगर, पाचगाव रोड-कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नितीन सदाशिव देसाई, सासू मंगल सदाशिव देसाई, सासरे सदाशिव बाबुराव देसाई (तिघे रा. पाचगाव रोड, कोल्हापूर) आणि नणंद शीतल अमर पाटील (रा. हडपसर, पुणे) अशा चौघांविरुध्द कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ४ जून २०२१ रोजी नितीन देसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसांनी सासरच्या मंडळींनी दागिन्यांवरून छळ करण्यास सुरुवात केली. लग्नाची सुट्टी संपल्यानंतर विवाहिता जर्मनी येथील कंपनीमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यावेळी सासू, सासरे व नवऱ्याने नोकरी सोडून कोल्हापुरात परत येण्यासाठी विवाहिवर दबाव आणत दमदाटी करून त्रास दिला. हा सर्व प्रकार फिर्यादीने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला होता. मात्र त्यांनी धीर दिला. जर्मनीतील नोकरीचा राजीनामा देऊन परतल्यानंतरही सासरच्या लोकांनी नोकरीतील पैसे आणि पगार पत्रकाची मागणी करत छळ सुरु केला.
त्यानंतर पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत असताना त्याठिकाणीही नणंद शीतलने अपमानास्पद वागणूक देत मानसिक त्रास दिला. पुणे येथील नोकरी सोडल्यानंतर विवाहिता पतीसोबत बेंगलोर येथे वास्तव्यास होती. त्याठिकाणीही नवरा किरकोळ कारणातून वाद घालत त्रास देत होता. गुंतवणूक करण्यासाठी २० लाखांची मागणी त्याने केली होती. काही दिवसांनी नवरा नितीन याने फिर्यादी विवाहितेस काही न सांगता बेंगलोर येथील राहत्या घरातील सामान घेऊन निघून गेला होता. वरील सर्व त्रास असह्य झाल्याने शेवटी विवाहितेने पोलिसात धाव घेतली. सहायक पोलिस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करीत आहेत.