Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:00 IST2025-11-13T18:59:02+5:302025-11-13T19:00:39+5:30
Local Body Election: भाजप, व शिंदेसेना गट मित्र पक्ष यांच्यातील उमेदवारीचा संघर्ष अजून सुटला नाही

Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार?
विकास शहा
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक अभिजित नाईक आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशाली नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे. त्यामुळे अभिजित नाईक यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, भाजप, व शिंदेसेना गट मित्र पक्ष यांच्यातील उमेदवारीचा संघर्ष अजून सुटला नाही. शिंदेसेना तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक यांना उमेदवारी मिळाल्यास, अभिजित नाईक आणि पृथ्वीसिंह नाईक या दोन चुलत भावांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
नगरपंचायत निवडणुकीबरोबरच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट संकेत दिल्याने या बैठकीबाबत सुरू असलेली चर्चा बंद झाली आहे. भाजपाला मोठा धक्का देत नाईक कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वगृही प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विरोधकांना मास्टरस्ट्रोक दिल्याचा आभास मिळतो. यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीबाबतही चर्चा थांबली आहे.
भाजपकडून केदार नलावडे तर शिंदेसेनेकडून पृथ्वीसिंह नाईक यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असताना तर काही भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याने शहरातील राजकीय वातावरण तणावग्रस्त झाले आहे.
नाराज झाल्यास तिरंगी लढतीचा धोका
गेल्या निवडणुकीत माजी आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या गटाची सत्ता होती. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत मानसिंगराव नाईक गटाने ११ जागा जिंकल्या, तर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या गटाने सहा जागा मिळवल्या, तर आमदार सत्यजित देशमुख यांच्या गटाला कोणतीही जागा मिळाली नाही. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची एकत्रित आघाडी तर दुसऱ्या बाजूला आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि ॲड. भगतसिंग नाईक यांची आघाडी होती. उमेदवारी वाटपात कोणीही नाराज झाल्यास, तिरंगी लढतीचा धोका वर्तविला जात आहे. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.