Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:12 IST2025-07-17T19:12:35+5:302025-07-17T19:12:53+5:30
पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले

Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक
दिघंची : "माणुसकीला हादरवणारी घटना" अशीच एक बाब मंगळवारी दुपारी उघडकीस आली. दिघंचीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पळसखेलजवळील आवळाई रस्त्यालगत असलेल्या पुलाखालील पाण्याच्या नळीमध्ये एका दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक फडक्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी माळरानावर गेला असता, त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज पडला. आवाजाचा मागोवा घेत त्याने पुलाखालील नळीमध्ये पाहिले असता, फडक्यात गुंडाळलेले अर्भक दिसून आले. त्याने तातडीने पळसखेल गावच्या पोलिस पाटील अश्विनी प्रकाश सावंत यांना याची माहिती दिली. पोलिस पाटील सावत यांनी घटनास्थळी धाव घेत आटपाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर अजिनाथ सावत, रोहित सावत, तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव पाटील, वैभव काळे यांच्या मदतीने अर्भकाला तत्काळ दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. सावंत यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले.
दरम्यान, या परिसरात वाहतूक अत्यंत कमी असून, माळरान व निर्जन भाग असल्याने ही घटना नियोजनबद्ध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका निष्पाप अर्भकाला असे बेवारस अवस्थेत टाकल्यामुळे समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या दु:खद घटनेचा आटपाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. अर्भकाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.