‘दहा पक्ष बदललेला बाबा कुणाचाच नाही’; जयंत पाटलांचे सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:34 IST2026-02-05T11:23:38+5:302026-02-05T11:34:33+5:30
राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

‘दहा पक्ष बदललेला बाबा कुणाचाच नाही’; जयंत पाटलांचे सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर
सांगली: राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. "दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, तो आता मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय, पण भाजपलाही पक्के ठाऊक आहे की हा माणूस कोणाचाच नाही," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले.
काही दिवसांपूर्वी वाळवा येथील एका जाहीर सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली होती. “आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात ते भाजपात येतील.” तसेच, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार घ्यावा, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या या विधानामुळे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीकेला आज जंयत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. "काही लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते. जयंत पाटील यांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे काहीही तथ्य नसलेली विधाने करणे हा त्यांचा रोजचा ठरलेला कार्यक्रम आहे."
"ज्यांनी स्वतः आयुष्यात दहावेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. अशा नेत्यांना कोणताही पक्ष गांभीर्याने घेत नाही, कारण त्यांची राजकीय भूमिका वारंवार बदलत असते. भाजपलाही त्यांच्या या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. शनिवारी मतदान होणार असून रविवारी निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशा लढती दिसत आहेत.